मुंबई : मुंबईतील मलनिःस्सारण उदंचन केंद्रांचे काम अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि तत्पर करण्यासाठी महापालिकेकडून आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य अडचणींचा आधीच अंदाज घेऊन निर्णय घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.
वांद्रे येथील अंतर्गामी मलनिःस्सारण उदंचन केंद्रात कार्यरत असलेल्या एआय आणि एमएल आधारित माहिती व विश्लेषण केंद्राची डॉ. शर्मा यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी प्रमुख अभियंता (मलनिःस्सारण प्रचालन) प्रचिती देसाई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या मलनिःस्सारण प्रचालन विभागाने मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि आयपंपनेट यांच्या सहाय्याने वांद्रे येथे हे माहिती व विश्लेषण केंद्र कार्यान्वित केले आहे.
उदंचन केंद्राची पाहणी
या केंद्राच्या माध्यमातून मलनिःस्सारण व्यवस्थेतील परिचालनाशी संबंधित माहितीचे एकत्रीकरण करून त्याचे विश्लेषण केले जाते. त्यातून उद्भवू शकणाऱ्या तांत्रिक किंवा परिचालनात्मक अडचणींची पूर्वकल्पना घेण्यास मदत होते.
डॉ. शर्मा यांनी केंद्राची कार्यपद्धती, निरीक्षण प्रणाली तसेच पूर्वानुमानात्मक विश्लेषणाची क्षमता याची माहिती घेतली. उदंचन केंद्राच्या कामकाजाशी संबंधित माहितीचे संकलन, एकत्रीकरण आणि त्यावर आधारित निर्णय प्रक्रिया यांचीही त्यांनी पाहणी केली. दरम्यान, एआयचा वापर करण्यात आला तर मलनि:सारण प्रक्रियेत अधिक अचूकता आणि कार्यक्षमता यात वाढ होणार आहे.
विश्लेषणात्मक वापरावर भर
मलनिःस्सारण उदंचन केंद्रांचे कार्य अधिक अनुकूलित आणि प्रभावी करण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि तंत्रज्ञान भागीदारांना दिल्या. मुंबई शहर आणि उपनगरांतील मलनिःस्सारण व्यवस्था अधिक कार्यक्षम व विश्वासार्ह करण्यासाठी मशीन लर्निंग, एआय आणि पूर्वानुमानात्मक विश्लेषणाचा वापर वाढवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.