भायखळा केबल पुलाचे काम अंतिम टप्प्यात; दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार 
मुंबई

भायखळा केबल पुलाचे काम अंतिम टप्प्यात; दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार

दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या भायखळा येथील केबल पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/मुंबई

दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या भायखळा येथील केबल पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (महारेल) या पुलाच्या सर्व ४० केबल यशस्वीपणे बसवून एक मोठा अभियांत्रिकी टप्पा पार पाडला आहे. २१ मे रोजी या पुलाची शेवटची केबल बसवण्यात आली असून, यामुळे १७३ मीटर लांबीच्या मुख्य पुलाला भक्कम आधार मिळाला आहे. दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.

हा नवा चारपदरी पूल सध्याच्या शतकोत्तर जुन्या भायखळा पुलाच्या समांतर बांधला जात आहे. एकूण ९१६ मीटर लांबीच्या या पुलावर ५० मीटर उंच पिलर (पायलॉन) उभारण्यात आला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि वाहनधारकांचा प्रवास सुकर करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पुलासाठी २८७ कोटी खर्च

भायखळा भाजी मार्केट आणि रेल्वे रुळांवरून गर्डर उभारणे हे या कामातील सर्वात मोठे आव्हान होते. रेल्वे वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता डेक इरेक्शन क्रेन तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम अत्यंत सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आले. सुमारे २८७ कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या पुलासाठी ५ हजार मेट्रिक टन उच्च क्षमतेच्या कार्बन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

नागरिकांसाठी ‘सेल्फी पॉइंट’

राष्ट्रीय सणांच्या दिवशी पुलावर रिमोट कंट्रोलद्वारे तिरंगी एलईडी रोषणाई केली जाईल, तसेच नागरिकांसाठी येथे 'सेल्फी पॉईंट'देखील विकसित केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी सध्याच्या 'वाय' पुलाचा एक भाग काढून तो या नवीन केबल पुलाला जोडला जाईल, असेही महारेलच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता; २०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट