मुंबई : सीबीएसई मंडळाच्या इतिहासाच्या पुस्तकात केवळ ६८ शब्द छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहेत. हे अपमानास्पद असल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. शिंदे सेनेच्या आमदार भावना गवळी यांनी संताप व्यक्त करत राज्य आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असतानाही अजूनही सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा समावेश करू शकलो नाही, ही खेदाची बाब आहे असा संताप व्यक्त करीत सरकारला घरचा आहेर दिला.
‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत प्रश्न विचारला. तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे, सीबीएससीच्या माध्यमातून देशातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे. राज्य शासनाने सीबीएसईच्या अभ्यासक्रमात एनसीईआरटीमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा समावेश व्हावा, असा प्रस्ताव पाठवला आहे. पण इतक्या गंभीर मुद्द्यावर केवळ प्रस्ताव धाडून हात झटकणे ही उदासीनता नाही का? असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला. आमदार भावना गवळी, अमित गोरखे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
केंद्राला अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करण्याची विनंती
राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अपुरा आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय मंत्री यांना भेटून सविस्तर व अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करण्याची विनंती केली आहे. त्यांनी अभ्यासक्रम समाविष्ट करण्याबाबत आश्वासन दिले आहे.