Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा 
मुंबई

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

मध्य रेल्वेने मुंबई विभागातील हमाल सेवा, पार्किंग आणि एसी प्रतीक्षागृहांचे अधिकृत दर जाहीर केले आहेत. तसेच रेल नीरचा मर्यादित पुरवठा लक्षात घेता मान्यताप्राप्त पिण्याच्या पाण्याच्या ब्रँडची यादीही प्रसिद्ध करण्यात आली असून, जादा शुल्क आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mayuri Gawade

मुंबई विभागातील रेल्वे प्रवाशांना जादा शुल्क आकारले जाण्यापासून संरक्षण मिळावे यासाठी मध्य रेल्वेने हमाल सेवा, पार्किंग आणि वातानुकूलित (एसी) प्रतीक्षागृहांच्या अधिकृत दरांची माहिती जाहीर केली आहे. तसेच, कोणत्याही प्रकारे जादा पैसे आकारले जात असल्यास रेलमदद (RailMadad) पोर्टल किंवा रेल्वे हेल्पलाइन १३९ वर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (Sr DCM) यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. सेवा घेताना प्रवाशांनी पावती घेणे आवश्यक असून, जादा शुल्क आकारल्यास पावतीचा फोटो जोडून तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अधिकृत पार्किंग दर जाहीर

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार, सायकल पार्किंगसाठी दोन तासांपर्यंत ५ रुपये शुल्क आकारले जाईल. दुचाकी वाहनांसाठी १० रुपये, तर कार आणि टॅक्सीसाठी २० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मासिक पाससाठी सायकलधारकांना ३०० रुपये, दुचाकींसाठी ४५० रुपये आणि कारधारकांना ७५० रुपये मोजावे लागतील.

हमाल सेवेचेही दर निश्चित

रेल्वे स्थानकांवर सामान वाहून नेण्यासाठी हमालांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबतही मध्य रेल्वेने स्पष्टता केली आहे.

४० किलोपर्यंतचे सामान डोक्यावर वाहून नेण्यासाठी प्रति फेरी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर दोन चाकी किंवा चार चाकी हातगाडीच्या माध्यमातून १६० किलोपर्यंतचे सामान नेण्यासाठी प्रति फेरी १५० रुपये आकारले जातील.

याशिवाय, दोन हमालांकडून व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर वाहून नेण्यासाठी १५० रुपये, तर चार हमालांकडून ही सेवा घेतल्यास २०० रुपये शुल्क आकारले जाईल.

एसी प्रतीक्षागृहासाठी किती मोजावे लागतील?

मुंबई विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवरील वातानुकूलित प्रतीक्षागृहाचा वापर करण्यासाठी प्रति व्यक्ती प्रतितास १० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

रेल नीरचा पुरवठा तात्पुरता कमी

दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांना आणखी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. रेल्वे प्रशासनाने ‘रेल नीर’ या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्पुरता कमी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. हार्बर मार्गावरील पनवेलसह काही स्थानके तसेच मुख्य मार्गावरील ठाणे ते कर्जत आणि कसारा या विभागांमध्ये रेल नीरची उपलब्धता मर्यादित राहू शकते.

अंबरनाथ येथील रेल नीर प्रकल्पात सुरू असलेल्या तांत्रिक सुधारणांचे काम आणि वाढती मागणी यामुळे हा तुटवडा निर्माण झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

रेल्वेने मान्यता दिलेले पाण्याचे ब्रँड

रेल नीरच्या मर्यादित उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १ लिटर बाटलीसाठी १४ रुपये दराने विक्रीस मान्यता दिलेल्या पर्यायी ब्रँडची यादीही जाहीर केली आहे.

या ब्रँडमध्ये ऑक्सीमोअर अ‍ॅक्वा, रोकोको, व्हेनिस ब्लू, ऑक्सी ग्रँड, ब्रायोटीन, सनरिच अ‍ॅक्वा, एल्विश, आयोनिटा, इन्वोलाइफ, स्प्लॅशर, ऑक्सीराईज, कन्हैय्या, केल्विनो, विघ्नहर्ता आरोग्यम आणि ऑक्सी ब्लू यांचा समावेश आहे.

प्रवाशांनी अधिकृत दरांनुसारच पैसे द्यावेत आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ रेलमदद किंवा हेल्पलाइन १३९ वर तक्रार करावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?

Mumbai : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना भेट; पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त