मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत राज्यभरातील बेरोजगारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या बडतर्फ जवानाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्ली येथे अटक केली. या मार्गाने मिळवलेल्या पैशातून आरोपीने चक्क दोन मराठी चित्रपटही काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मूळचे बीड येथील रहिवाशी आणि सध्या नवी मुंबई येथे राहणाऱ्या फिर्यादीला तसेच इतर तरुणांना अकोला जिल्ह्यातील बार्शी येथे राहणाऱ्या आरोपी नीलेश राठोड याने सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी पाच ते पंधरा लाख रुपये उकळून पसार झाला होता.
२०२२ पासून राठोड याने शेकडो तरुणांची फसवणूक केली होती. आतापर्यंत त्याने दोन कोटी ८८ लाख रुपये उकळल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केले होते. त्याच्याविरोधात ६० तरुणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याची पत्नी दिल्लीत राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक दिल्लीला गेले. तेथील द्वारका मोड परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेव्यतिरिक्त राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या सर्व प्रकरणात तो फरार होता.