मेघा कुचिक
मुंबई : दिल्लीपाठोपाठ मुंबईच्या शिवाजी पार्क येथे रविवारी सायंकाळी कॉकराेचच जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये कथित फेरफार करण्यात आल्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन केले. यावेळी, मुंबई पोलिसांनी ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांच्यासह शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले.
शिवाजी पार्क परिसराला रविवारी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मैदानाकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर आणि रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हजारो पोलिस सर्व परिसरात तैनात केले होते. शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते पोलिसांनी अडवले होते. तसेच मैदानाजवळून जाणाऱ्या सामान्य नागरिकांचीही चौकशी केली जात होती.
मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी
निर्बंध असूनही काही आंदोलक शिवसेना भवनाजवळील लेडी जमशेदजी रोडवर दाखल झाले. त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘मोदी जब-जब डरता है, पुलिस को आगे करता है’, ‘वोट चोर, गद्दी छोड़’ आणि ‘ज्ञानेश कुमार, इस्तीफा दो’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. या आंदोलकांना शिवसेना भवनाजवळ ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आपच्या नेत्या अंजली दमानिया यांना राजा बढे चौकातून ताब्यात घेण्यात आले.
आंदोलकांची सुटका करण्याची मागणी
या आंदोलनादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, त्यांचे बंधू तेजस ठाकरे, अमित ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) आमदार वरुण सरदेसाई आंदोलकांच्या समर्थनार्थ सहभागी झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याची मागणी त्यांनी केली.
आदित्य ठाकरेंनी अडवली पोलिस व्हॅन
शिवसेना भवनाजवळ आंदोलक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर आदित्य आणि तेजस ठाकरे रस्त्यावर उतरले. आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला आदित्य ठाकरे यांनी अडवले. ते व्हॅनवर चढले आणि पोलिसांच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यानंतर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात जाऊन आंदोलकांची सुटका करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी लवकरच सर्व आंदोलकांची सुटका केली. अमित ठाकरेही लगेच शिवाजी पार्क येथे दाखल झाले. आंदोलकांना घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन थांबवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. सीजेपी समर्थक आणि अन्य आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, ‘आणीबाणीच्या काळातही असे पोलीस कोणी पाहिले नव्हते.’
विद्यार्थ्याला भीतीमुळे तीव्र झटका
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका विद्यार्थ्याला ताडदेव पोलिस ठाण्यात भीतीचा तीव्र झटका आला. त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘स्मिथ’ नावाच्या एका आंदोलकाने सांगितले, ‘आंदोलकांना ताब्यात घेणे आता नेहमीचे झाले आहे. ही कारवाई लाजिरवाणी आहे. आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे. यावरून देशात आता लोकशाही उरलेली नाही, हे दिसून येते.’
तिरंगा फडकवणे गुन्हा आहे का?...
‘फरिदा’ या आंदोलकानेही पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तावर प्रश्न उपस्थित केले. ताब्यात घेण्यापूर्वी त्या म्हणाल्या, ‘शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची आम्हाला माहिती आहे. विशेषतः शनिवारी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही व्यवस्था करण्यात आली आहे. तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे का? इतक्या मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. काहीही बेकायदेशीर न करता केवळ उभ्या असलेल्या लोकांनाही ते ताब्यात घेत आहेत.”
पोलीसांकडून अटक नव्हे अपहरण...
शिवाजी पार्क येथे आलेल्या एका महिलेने हे आंदोलन शांततापूर्ण असल्याचे सांगत पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘हे शांततापूर्ण आंदोलन आहे. आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे. हे लोकशाहीचे लक्षण नाही. पोलीस केवळ आंदोलकांना ताब्यात घेत नाहीत, तर त्यांचे अपहरण करत आहेत. हे आणीबाणीसारखे आहे. आंदोलकांना फरफटत नेत असून त्यांना ताब्यात घेत आहेत. पोलिसांच्या माध्यमातून सरकार तरुणांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.”
तुषार गांधींसह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
पूनम अपराज
मुंबई : सीजेपी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदानाकडे निघालेल्या ६०० हून अधिक लोकांना नाना चौकातून शनिवारी ताब्यात घेण्यात आले. यानंतर गावदेवी पोलिसांनी विविध कलमांतर्गत रविवारी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा विविध क्षेत्रातील प्रमुख १२ आणि अन्य ३५० व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तुषार गांधी, शैलेंद्र कांबळे, प्रकाश रेड्डी आणि अभिनेता इम्रान खान यांचा समावेश आहे.