दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 
मुंबई

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

योग्य पुरावे उपलब्ध होईपर्यंत कोणालाही आरोपी मानले जाऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी (दि. २) महत्त्वाचे वळण मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदविण्याचे आदेश देत तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविली. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.

दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका इमारतीत मृत्यू झाला होता. ती २८ वर्षांची सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबतही मॅनेजर म्हणून काम केले होते. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून रोजी सुशांतसिंह राजपूतचा वांद्रे येथील राहत्या घरी मृत्यू झाला होता.

पुराव्याशिवाय कोणालाही आरोपी करू नका

'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार, CBI कडे तपास सोपविताना उच्च न्यायालयाने FIR मध्ये कोणालाही आरोपी म्हणून नाव न देण्याचे निर्देश दिले. योग्य पुरावे उपलब्ध होईपर्यंत कोणालाही आरोपी मानले जाऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच संशय निर्माण झाल्याशिवाय कोणालाही ताब्यात घेऊ नये, असेही निर्देश देण्यात आले.

तपासात काहीही आढळून न आल्यास समरी रिपोर्ट (अंतिम अहवाल) दाखल करावा, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे CBI तपास सुरू होणार असला तरी संबंधित व्यक्तींवर थेट आरोप निश्चित झालेला नाही.

पाच वर्षांपासून चौकशी सुरू

दिशाच्या मृत्यूनंतर एडीआरअंतर्गत प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी काही महिन्यांत बंद करण्यात आली होती. मात्र, सोशल मीडियावरील विविध दाव्यांनंतर २०२३ मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली. इतका प्रदीर्घ काळ ही चौकशी का सुरू ठेवण्यात आली, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.

मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी राज्य सरकारची बाजू मांडताना दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा दावा कायम ठेवला. निवासी इमारतीच्या कथित १२ व्या मजल्यावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी पक्षाने दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा दावा केला. मात्र, पंचनामा, मृतदेहाची छायाचित्रे आणि अन्य कागदपत्रांचा आढावा घेताना न्यायालयाने काही बाबींवर प्रश्न उपस्थित केले. या टप्प्यावर कोणताही अंतिम निष्कर्ष काढत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंवरील आरोपांचाही उल्लेख

सतीश सालियन यांच्या याचिकेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा कथित संशयित म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी हे आरोप राजकीय वैरातून आणि हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा दावा केला.

दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मात्र, हा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. आता CBI कडून होणाऱ्या तपासातून या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास केला जाणार आहे.

उच्च न्यायालयाने या प्रकरणातील कोणत्याही राजकीय पैलूशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कायद्याचे पावित्र्य राखणे आणि दिशा सालियनच्या कुटुंबाला या प्रकरणात अंतिम उत्तर मिळवून देणे हाच न्यायालयाचा उद्देश असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

आज अश्रू अनावर झाले...

मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI ला FIR नोंदविण्याचे निर्देश दिल्यानंतर तिचे वडील सतीश सालियन भावुक झाले. "मी न्यायाधीशांचे आभार मानले. तुमच्या सर्वांमुळे मला न्याय मिळाला. आजपर्यंत मी एकही अश्रू ढाळला नव्हता, दिशा गेली तेव्हाही नाही. मात्र, आज अश्रू अनावर झाले आहेत," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढील कायदेशीर कारवाईबाबत वकिलांचा सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगत सतीश सालियन म्हणाले, "वकिलांचा जो सल्ला असेल, त्यानुसार मी पुढे जाईन. आज तो दिवस आला आहे. सत्याचा विजय झाला असून, पुढेही सत्याचाच विजय होईल," असे सतीश सालियन यांनी भावुक होत सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदल्यांसाठी पुन्हा ‘कॅश फॉर ट्रान्सफर’; पालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणेंची चौकशी करा - आमदार मिहीर कोटेचा यांची मागणी

Mumbai : आता रस्त्यांवरील धूळ शोषणार; बहुउद्देशीय २९ वाहनांची तैनाती, ८० कोटींचा खर्च

Mumbai : विरारच्या 'बार्बेक्यू नेशन'मध्ये डेझर्टच्या प्लेटवर चक्क झुरळ; किळसवाण्या प्रकाराचा VIDEO व्हायरल

टेंभीनाक्याची हंडी पुन्हा ठाण्याच्या उत्सवाला नवी उंची देणार; मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजारांचे पारितोषिक

Pune : कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय