सोमेंद्र शर्मा/मुंबई
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर विभागाने (मुंबई क्षेत्र) आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सुरू असलेल्या वन्यजीव तस्करीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मालाबार जायंट स्क्विरल (शेकरू), इंडियन स्टार कासव, जंगल फाऊल आणि स्मॉल इंडियन सिव्हेट यांसारख्या दुर्मिळ वन्यप्राण्यांची अवैध व्यापार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवस चाललेल्या या धडक कारवाईत डीआरआय अधिकाऱ्यांनी श्रीकाकुलम शहरात एका संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिंजऱ्यात बंदिस्त अवस्थेत असलेले ४ मलाबार जायंट स्क्विरल, १ इंडियन स्टार कासव आणि १४ जंगल फाऊल यांची सुटका करण्यात आली.
यानंतर केलेल्या सखोल चौकशीतून, श्रीकाकुलमपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या रायाकुर्डी गावात एका दुर्गम ठिकाणचा शोध लागला. तेथून दोन स्मॉल इंडियन सिव्हेटच्या पिल्लांचीही यशस्वी सुटका करण्यात आली. या कारवाईमुळे तस्करीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
कायद्याचे उल्लंघन
मलाबार जायंट स्क्विरल, स्मॉल इंडियन सिव्हेट आणि इंडियन स्टार कासव हे प्राणी वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या 'शेड्युल-१' अंतर्गत येतात. या कायद्यानुसार, या प्राण्यांची शिकार करणे, त्यांना बाळगणे, वाहतूक करणे किंवा त्यांचा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा असून त्यांना सर्वोच्च संरक्षण कवच प्रदान करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले प्राणी आणि संशयित आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीकाकुलम वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
बेकायदेशीर व्यापारामुळे जैवविविधतेला गंभीर धोका
विदेशी पाळीव प्राण्यांच्या बाजारात आणि वन्यजीव संग्राहकांमध्ये या प्राण्यांना मोठी मागणी असल्याने तस्करीचे प्रमाण वाढले आहे. अशा बेकायदेशीर व्यापारामुळे जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वनविभाग आणि इतर यंत्रणांच्या समन्वयाने वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी डीआरआय सदैव सतर्क आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्याने दिली.