पूनम अपराज/मुंबई
दुबईतून चालणाऱ्या सायबर गुन्हेगारांना आर्थिक आणि तांत्रिक रसद पुरवणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक सिंडिकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (युनिट -२) पर्दाफाश केला आहे. मुंबईतील 'जे.डी. ओव्हरसीज' या एका बोगस कंपनीच्या नावाखाली हे संपूर्ण रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बँक खाती, सिम कार्ड्स आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.
या प्रकरणी मोहम्मद करीम (४२), चिराग चावडा (२९), भावेश माहेश्वरी (२९), रोहन चावडा (२८), विशाल मारू (२२) आणि गोविंद बुचिया (२९) यांना अटक करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण महाराष्ट्रातील असून उर्वरित पाच जण गुजरातचे रहिवासी आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने मशीद बंदर येथील पार्श्व चेंबर्समधील रूम नंबर ३०३ वर छापा टाकला. या ठिकाणी आरोपींनी जे.डी. ओव्हरसीज नावाने एक बोगस कंपनी स्थापन केली होती. तपासात असे समोर आले की, या कंपनीचा वापर मुंबईतील विविध बँकांमध्ये चालू खाती उघडण्यासाठी केला जात होता. या बँक खात्यांचे तपशील आणि सिम कार्ड्स दुबईतील हँडलर्सना पुरवले जात आणि सायबर होते, ज्यांचा वापर ऑनलाइन गेमिंग फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी केला जात होता.
जप्त केलेले साहित्य
६६ एटीएम कार्ड्स, १५ बँक पासबुक्स, १२२ चेक बुक्स, २ लेनोवो कॉम्प्युटर्स आणि १ कॅनन प्रिंटर, १२ सिम कार्ड्स आणि २ पेन ड्राईव्हज, विविध कंपन्यांचे ६८ रबरी शिक्क्यांसह पोलिसांनी विविध बँकांचे खाते उघडण्याचे फॉर्म्स आणि अनेक कंपन्यांचे औद्योगिक नोंदणी प्रमाणपत्रेही जप्त केली आहेत.
कोट्यवधींची उलाढाल
आरोपींनी उघडलेली ही बँक खाती देशातील किमान १८ सायबर गुन्ह्यांमध्ये वापरली गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून याद्वारे कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. पोलीस उपायुक्त (गुन्हे) राज टिळक रोशन यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईचा तपशील जाहीर केला. मुख्य आरोपी मोहम्मद शब्बीर अब्दुल करीम हा आधी कपड्यांच्या व्यवसायात होता. व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे, झटपट पैसे कमावण्याच्या आमिषाने तो या गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये सामील झाला.