वसई : वसई-विरार महानगर क्षेत्रामधील नालासोपारा पूर्व येथील अग्रवाल नगर भागात उभारलेल्या ४१ अनधिकृत इमारतींवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत एकाच वेळी १३ ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने ही कारवाई ६० एकर शासकीय व खासगी जमिनीवर बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या इमारती आणि त्या संदर्भातील आर्थिक उलाढाल, मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून सुरू केली आहे. या प्रकरणात बहुजन विकास आघाडी पक्षाचा माजी नगरसेवक सिताराम गुप्ता यांच्याविरुद्ध थेट कारवाई करण्यात आली असून त्यांच्यासह नामांकित बिल्डर अनिल गुप्ता यांच्याविरुद्धही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीच्या प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, संबंधित जमीन वसई-विरार महानगरपालिकेच्या मालकीची असून ती मूळतः सांडपाणी प्रक्रिया केंद्र व डंपिंग ग्राउंडसाठी राखीव होती. मात्र संबंधित राजकीय आणि बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने या जमिनीवर अनधिकृत प्लॉटिंग केली आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर निवासी व व्यावसायिक इमारती उभारल्या. ईडीच्या माहितीनुसार, या इमारतींमध्ये कोणताही कायदेशीर परवाना, अधिकृत आराखडा किंवा शासनाची मंजुरी घेतलेली नाही. तरीसुद्धा हजारो चौरस फूट क्षेत्रफळाच्या या इमारती नागरिकांना विकल्या गेल्या आणि त्यातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत माजी नगरसेवक सिताराम गुप्ता यांची भूमिका अत्यंत संशयास्पद ठरली आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय पदाचा गैरवापर करत स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव आणून प्रकल्पांना प्रशासकीय आशीर्वाद मिळवून दिला, असा ईडीचा
आरोप आहे.
ईडीच्या कारवाईनंतर आता वसई-विरार महानगरपालिकेतील प्रशासनावरही संशयाची सुई वळली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम घडत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे, काही अधिकारी या व्यवहारात थेट सहभागी होते आणि त्यांनी या बेकायदेशीर कामांना डोळेझाक करून मूकसंमती दिल्याचे संकेत मिळत आहेत. ईडीने ज्या १३ ठिकाणी छापे टाकले त्यामध्ये सिताराम गुप्ता यांचे निवासस्थान, अनिल गुप्ता यांचे कार्यालय आणि अनेक बांधकाम प्रकल्पांचा समावेश आहे. आर्थिक व्यवहारांचे दस्तावेज, बँक खात्यांचे तपशील, रजिस्ट्रेशन कागदपत्रे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या सर्व माध्यमांतून आर्थिक गुन्ह्याचे स्पष्ट पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.