मुंबई

राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटवे,एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्यमंत्री मंगळवारी मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते

प्रतिनिधी

लोकांचे प्रश्न सोडवताना सकारात्मकता ठेवा. त्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्या. राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा, असे निर्देश दिले.

मुख्यमंत्री मंगळवारी मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची देशात एक चांगली प्रतिमा आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच इतर केंद्रीय मंत्रीदेखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी नावीन्यपूर्ण योजना आपण मांडल्या पाहिजेत. नवनवीन उपक्रमांचे स्वागत आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तत्काळ असे प्रस्ताव सादर करावेत. विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढवावा. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतिमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन आणि प्रशासन ही राज्य कारभाराच्या रथाची दोन चाके आहेत. दोघांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. राज्यातील नवीन सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकरी, कामगार, शेतमजूर, यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. सरकारची प्रतिमा ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. यासाठी सर्वांनी राज्याच्या हिताची कामे प्रभावीपणे करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करावी. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यासाठी गती द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत