मुंबई : खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमान पत्राचा वापर करणे चांगलेच महागात पडले आहे. ५ ते १६ जून या कालावधीत मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण ५५ अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २६ आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ पॅकिंग किंवा विक्रीसाठी वर्तमानपत्राचा वापर होत असल्याचे आढळून आले. एकूण २६ उल्लंघन प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यापैकी १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. संबंधित अन्न व्यावसायिकांकडून १ लाख ५१,००० इतका तडजोड दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये पुढील कार्यवाही सुरू आहे. ही मोहीम बृहन्मुंबई विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी तसेच साहायक आयुक्त (अन्न) यांनी महेश चौधरी, सहआयुक्त (अन्न), बृहन्मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार राबवण्यात आली.
अन्नपदार्थ पॅकिंग करण्यासाठी अथवा थेट संपर्कात येईल अशा प्रकारे वर्तमानपत्राचा वापर करणे हे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने अशा वापराला मनाई असल्याबाबतच्या सूचना या आधी जारी केल्या आहेत. छपाईच्या शाईमध्ये अनेक हानिकारक रंग, रसायने, शिसे आणि इतर जड धातूंचा समावेश असतो, ते अन्नपदार्थामध्ये उतरू शकतात आणि त्यामुळे आरोग्याच्या गंभीर आणि दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. वृत्तपत्रांचे वितरण आणि हाताळणी दरम्यान ती अनेकदा अस्वच्छ परिस्थितीच्या संपर्कात येतात, त्यामुळे ती आजार निर्माण करणाऱ्या रोगजंतूंचे वाहक बनू शकतात.
नियमांचे पालन करा!
अन्नपदार्थ गरम असताना किंवा तेलकट पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळल्यास शाईतील रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून आरोग्याला अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी वर्तमानपत्राचा वापर तात्काळ बंद करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
...तर कारवाई करणार
अन्न व औषध प्रशासनामार्फत अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा नियमितपणे राबवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महेश चौधरी, सहआयुक्त (अन्न), बृहन्मुंबई यांनी दिला आहे.