'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा 
मुंबई

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

‘देशातील १३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. ही मतचोरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे ‘ज्ञानेश कुमार मस्ट गो’चा नारा देत केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला नाही तर पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन केले जाईल’, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला.

Swapnil S

मुंबई : ‘देशातील १३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. ही मतचोरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे ‘ज्ञानेश कुमार मस्ट गो’चा नारा देत केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला नाही तर पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन केले जाईल’, असा इशारा कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला. तसेच तीन दिवस काय, तीन महिनेही तुरुंगात टाकण्यात आले तरी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीमार्फत शुक्रवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी मैदानाच्या सहा नंबर प्रवेशद्वारावर एका ट्रकलाच या आंदोलनाचे व्यासपीठ बनविण्यात आले होते. यावेळी अभिजीत दीपके यांनी मतदार विशेष पडताळणी मोहिमेवरून (एसआरआय) केंद्र सरकारला लक्ष्य केले.

आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्याची भूमिका दीपके यांनी घेतली होती. आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून तरुणाई शिवाजी पार्कवर जमली होती. शिवाजी पार्कच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शिवाजी पार्क मैदानात जाण्यास बंदी केल्याने सीजीपीने मैदानाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला. विशेष म्हणजे ज्येष्ठ सिने अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, शर्लिन चोपडा, गायक विशाल ददलानी, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही आंदोलनाला हजेरी लावली. तर ठाकरे गटाकडून स्थानिक आमदार महेश सावंत, नगरसेवक साईनाथ दुर्गे हे उपस्थित राहिले होते.

तुरुंगात टाकले तरी हटणार नाही...

‘महात्मा गांधी जयंती दिनी लोकशाही, मतदानाचा अधिकार आणि नागरिकांच्या हक्कांसाठी आंदोलन करताना तुरुंगात टाकण्यात आले तरी मागे हटणार नाही’, असा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला. गांधीजी हे देशाचा आत्मा असून जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत गांधी जिवंत आहेत, असे सांगत गोडसे येतील आणि जातील, पण हा देश गांधींच्या विचारांवर टिकून आहे’, अशा शब्दांत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला.

अन्यथा मोदींना राजीनामा द्यावा लागेल

मतचोरीसाठी ज्ञानेश कुमार यांचा वापर केला जात आहे. यामागचे सूत्रधार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असल्याचा आरोप करत पंतप्रधान जर ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेणार नसतील तर मोदींच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करू. ज्ञानेशकुमार जाणार नसतील तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

गांधींना कुणीही संपवू शकत नाही...

अभिजीत दीपके यांनी संघ, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ‘एखादा महामानव येईल आणि म्हणेल की, मी नॉन बायोलॉजिकल आहे. पण सांगायची गरज नाही, कारण तुम्ही पुरुषच नाही. ते स्वत:ची तुलना गांधी आणि नेहरूंशी करत आहेत. पण गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्यापेक्षा मोठे होण्याची तुमची योग्यता नाही. कारण गांधी देशाचा आत्मा आहेत, आंबेडकर देशाचा कणा आहेत आणि नेहरू देशाचे ज्ञान आहेत. हा देश गांधींच्या विचारांवरच टिकून आहे. गांधी नसते तर हा देश नसता. त्यामुळे कितीही प्रयत्न करा. गांधींना तुम्हीच काय कुणीही संपवू शकत नाही’, असा इशारा दीपके यांनी दिला.

...तर आंदोलन करणारच : शबाना आझमी

आमचे मत हा आमचा अधिकार आणि आमचा आवाज आहे. मतदार यादीतून आमचे नाव गायब केले तर आम्ही आंदोलन करणारच. हा आमचा हक्क आहे, असे ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी यावेळी सांगितले. लोकशाही आणि संविधानाने दिलेला तो आमचा अधिकार असून कोणतीही चुकीची गोष्ट सहन करणार नाही. हा आपला देश आहे आणि संविधानाने तो अधिकार आपल्याला दिला असल्याचेही त्या म्हणाल्या. गायक विशाल ददलानी यांनी ’मेरा रंग दे बसंती चोला’... या गाण्याच्या धर्तीवर 'मेरा रंग दे बसंती चोला...ग्यानू तू उठाले अपना झोला.. ' असे गाणे सादर केले.

‘गद्दार ज्ञानू मस्ट गो’...

  • ‘ज्ञानू, तुझा डेमोक्रसीवर भरोसा नाय काय?’, ‘ज्ञानेश ब्रो, जस्ट राजीनामा द्या’ आणि ‘गद्दार ज्ञानू मस्ट गो’ अशा घोषणांचे फलक आणि तिरंगा फडकवत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियासह विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि तरुण या भागात दाखल झाले होते.

  • आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी हटके साहित्य आणले होते. सायन येथील मनीष मंडल या विद्यार्थ्याने ‘मेलोडी’ चॉकलेटच्या रॅपरपासून बनवलेले दागिने घातले होते.

ज्येष्ठाचा हृदयविकाराने मृत्यू

शिवाजी पार्क येथे आंदोलन सुरू असताना गोपालकृष्ण सुब्बय्या पिल्लई (७५) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पिल्लई हे ठाण्याचे रहिवासी होते. सीजेपीच्या आंदोलनासाठी पिल्लई दुपारी शिवाजी पार्कला पोहोचले. सायंकाळी ५ वाजता त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित मित्र आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

देशभरात निदर्शने

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारपासून विरोधी पक्षांनी देशभरात दिल्ली, पाटणा, लखनाै, अहमदाबाद, केरळ या ठिकाणी निदर्शने केली. इंडिया आघाडीकडूनही २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान निदर्शनांची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष तसेच आयसा, एसएफआय, एनएसयूआय आणि इतर विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी नवी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. येथे ७०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘आप’च्या वतीने जंतरमंतरवर काढलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ‘आप’चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज आणि आमदार संजीव झा यांना ताब्यात घेतले. आंदोलनाचे ठिकाण आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती.

शिवाजी पार्कवर आंदोलन संपल्यावर हाणामारी

आंदोलन संपल्यानंतर आंदोलक आणि हिंदू विचारधारेच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत सीजीपीचे कार्यकर्ते जखमी झाले. यामध्ये मध्यस्थी करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलन संपल्यानंतर दोन्ही गटांतील काही लोकांमध्ये वाद झाला. काही स्लोगन आणि घोषणांवरून वाद विकोपाला गेला. दोन्ही बाजूंकडून घोषणा सुरू झाल्याने परिस्थिती चिघळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

शिक्षणाचे खासगीकरण कंपनीकरणाच्या दिशेने

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ३ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रोजच्या आहारात मोड आलेले कडधान्य खाता? वेट लॉस आणि प्रोटीनसाठी कोणते निवडाल, जाणून घ्या

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले