Mumbai : हॉटेलचे खाणे महागणार; सर्व पदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के होणार वाढ, ‘आहार’ संघटनेचा निर्णय  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : हॉटेलचे खाणे महागणार; सर्व पदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के होणार वाढ, ‘आहार’ संघटनेचा निर्णय

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये स्टार्टरमध्ये पनीर चिल्ली, पनीर क्रिस्पी, पनीर चिजबॉल हादडताना आपण तहान-भूक विसरतो.

Swapnil S

मुंबई : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये स्टार्टरमध्ये पनीर चिल्ली, पनीर क्रिस्पी, पनीर चिजबॉल हादडताना आपण तहान-भूक विसरतो. मेनकोर्समध्ये व्हेज हंडी, पनीर ६५, पनीर चिलीमिली, व्हेज कोल्हापुरी, बिर्याणी, पुलाव आदी चविष्ट पदार्थांवर ताव मारताना आपल्याला कशाचेच भान राहत नाही. जेवणानंतर शीतपेय, आइस्क्रीम खाल्ल्यानंतर तृप्तीचा ढेकर येतो. त्यानंतर येते ते आपण खालेल्या पदार्थांचे बिल. आता यापुढे हे बिल १० ते १५ टक्क्यांनी महागणार आहे.

अन्नपदार्थ, इंधन, वीज यांचे वाढलेले दर, स्वच्छता आदी प्रत्येक बाबतीत वाढणाऱ्या महागाईची झळ हॉटेल व्यवसायालाही बसली असून त्यांनी सर्वच पदार्थांच्या दरांमध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय ‘आहार’ संघटनेने घेतला आहे. त्यामुळे या दरवाढीमुळे एका कुटुंबाला हॉटेलमध्ये जेवायला जाताना यापुढे किमान ५ हजार रुपये खिशात ठेवावे लागणार आहेत.

अन्नपदार्थांसाठीच्या खर्चात सातत्याने वाढ

मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणाच्या दरांत येत्या काही आठवड्यांत १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) आपल्या सदस्य रेस्टॉरंटमधील मेन्यूचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. अन्नपदार्थ तयार करणे आणि ग्राहकांना सेवा देण्यासाठी येणाऱ्या खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांवरील आर्थिक भार कमी ठेवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून रेस्टॉरंट चालकांनी वाढीव खर्च स्वतः सहन केला होता.

इंधन, वाहतूक, जागांचे भाडे, वेतनातील वाढीचा परिणाम

‘आहार’चे अध्यक्ष विजय के. शेट्टी म्हणाले, ‘शहरातील रेस्टॉरंट व्यवसायासमोरील आव्हान केवळ एखाद्या वस्तूच्या किमतीपुरते मर्यादित नाही. स्वयंपाकासाठी लागणारे इंधन, दैनंदिन खाद्यपदार्थ, व्यावसायिक जागांचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वाहतूक या सर्वांचा खर्च वाढला आहे. या सर्व खर्चांत एकाच वेळी वाढ होत असल्याने रेस्टॉरंटच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या नफ्यावरचा दबाव वाढत आहे.’

दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ विविध अहवालांतून समोर आली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत कांद्याच्या किमतीत जवळपास ११३ टक्के, साखरेच्या किमतीत सुमारे २२ टक्के आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत १८ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही आठवड्यांत प्रमुख डाळींच्या किरकोळ किमती प्रतिकिलो २० ते ३० रुपयांनी वाढल्याचे वृत्त आहे. या वस्तूंची दररोज खरेदी करणाऱ्या रेस्टॉरंट चालकांना वाढत्या किमतींचा अनेक पदार्थांच्या निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चावर होणारा विपरित परिणाम सहन करावा लागत आहे.

एलपीजी सिलिंडर किमतीतही झालीय १०० टक्के वाढ

खाद्यपदार्थांच्या किमतींबरोबरच व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही १०० टक्के वाढ झाल्याचे ‘आहार’ने म्हटले आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्याने मेन्यूमधील अनेक पदार्थ तयार करण्याचा खर्चही वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा खर्च वाढत असल्याने रेस्टॉरंट चालकांना त्यांच्या वेतनात आणि मनुष्यबळावरील खर्चातही वाढ करावी लागत आहे. त्यातच व्यावसायिक जागांच्या भाड्यात वाढ झाल्याने एकूण खर्चाचा भार अधिक वाढला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘रेटकार्ड’ बंधनकारक; खासगी रुग्णालयांत दर्शनी भागांत दरपत्रक लावणे आवश्यक, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

‘जंतरमंतर’ ते ‘आयफेल टॉवर’!

आजचे राशिभविष्य, १७ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Navratri 2026 : उपवासासाठी बनवा राजगिऱ्याचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी

Skin Care : चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा उजळते का? करीना-करिश्माच्या सवयींबाबत तज्ज्ञ सांगतात...