मुंबई : मुंबईमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भायखळा येथील बी. ए मार्गावरील न्यू ग्रेड इंस्टा मिल जवळच्या एका गगनचुंबी इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर अचानक आग लागली. तब्बल ३ तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
भायखळ्यातील ‘सालसेट’ या ५७ मजली इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवाशांनी सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीतून पळ काढला. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, तसेच संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलातर्फे आगीला १० वाजून ४२ मिनिटांनी क्रमांक एकची वर्दी देण्यात आली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचे लोळ आजूबाजूच्या परिसरात पसरले होते. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर ताबा मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.