मुंबई

Mumbai-Pune Expressway Tragedy: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण दुर्घटना; अपघातात IITच्या ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

‘आयआयटी, मुंबई’तील विद्यार्थ्यांच्या कारला मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी पनवेलजवळ घडली.

Swapnil S

नवी मुंबई : ‘आयआयटी, मुंबई’तील विद्यार्थ्यांच्या कारला मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी पनवेलजवळ घडली. कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पवईतील आयआयटीच्या कॅम्पसमध्ये शोककळा पसरली असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

‘आयआयटी, मुंबई’त शिक्षण घेणारे ओम कुमार बोरसे, श्रेयांश शर्मा, लय देशभ्रतार, हितेश कुमार मीणा, सोहम चव्हाण आणि सिद्धांत जेबल हे सहा विद्यार्थी बुधवारी रात्री ११ च्या सुमारास चित्रपट पाहण्यासाठी कॅम्पसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ते खंडाळा येथील सनराईज पॉईंट पाहण्यासाठी तीन वेगवेगळ्या कारमधून लोणावळ्याच्या दिशेने गेले होते. पहाटे सूर्योदय पाहिल्यानंतर सर्व जण परतीच्या प्रवासाला निघाले होते. यावेळी ओम कुमार बोरसे (२३, रा.नाशिक), श्रेयांश शर्मा (२२, रा.जयपूर) व लय देशभ्रतार (२०, रा. नागपूर) हे तिघेही एका फोक्सवॅगन पोलो कारमध्ये होते. तर त्यांचे इतर तीन मित्र दोन कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. हा परतीचा प्रवास ओम, श्रेयांश व लय यांच्यासाठी अखेरचा प्रवास ठरला.

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भाताण बोगदा ओलांडल्यानंतर तीन विद्यार्थी असलेली फोक्सवॅगन पोलो कार दुसऱ्या लेनमधून वेगाने येत होती. यावेळी कारचालकाने समोर असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करण्यासाठी आपली कार तिसऱ्या लेनमधून अचानक सर्व्हिस लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सदर कार पुढे असलेल्या कंटेनर ट्रेलरवर धडकली. या भीषण अपघातात कारमधील ओम, श्रेयांश व लय या तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. ‘एक्स्प्रेस वे’वर लेनची शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या बाजूने आणि वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामुळे हा मोठा अनर्थ घडला. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट

खरात प्रकरणाचे विधिमंडळात उमटणार पडसाद; राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा

खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला : मुख्यमंत्री; कोण कोण त्याच्याकडे जायचे याचे पुरावेही हाती; कोर्टात उद्या करणार हजर

विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम! देशातील ८,९३१ दिवसांच्या कार्यकाळासह सर्वाधिक काळ सरकारप्रमुख