IIT पदवीधराकडून मांजरांसाठी अभिनव डिजिटल नकाशाची निर्मिती; मुंबईतील भटक्या मांजरांचा डेटा आता एका क्लिकवर 
मुंबई

IIT पदवीधराकडून मांजरांसाठी अभिनव डिजिटल नकाशाची निर्मिती; मुंबईतील भटक्या मांजरांचा डेटा आता एका क्लिकवर

मुंबईतील छोट्या-मोठ्या गल्ल्या, उपनगरीय रेल्वे स्थानके आणि सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो भटक्या मांजरांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी ‘म्यावमुंबई’ हे नवीन डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.

प्रतिनिधी

धैर्य गजारा/मुंबई

मुंबईतील छोट्या-मोठ्या गल्ल्या, उपनगरीय रेल्वे स्थानके आणि सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो भटक्या मांजरांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी ‘म्यावमुंबई’ हे नवीन डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. आयआयटी गुवाहाटीचे पदवीधर आणि सध्या मुंबईत उत्पादन व्यवस्थापक (प्रॉडक्ट मॅनेजर) म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय सुदर्शन बिर्ला यांनी या वेबसाइटची निर्मिती केली आहे.

सुदर्शन बिर्ला यांनी सांगितले की, “मुंबईत आल्यानंतर त्यांना जागोजागी भटक्या मांजरांची मोठी संख्या दिसून आली. सुरुवातीला ते केवळ या मांजरांचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत होते. मात्र, अनेक मांजरांना वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच, मुंबईतील एनजीओ आणि प्राणीमित्रांचे जाळे इतके मोठे आहे की, मदतीसाठी नेमके कोणाशी संपर्क साधावा, हे समजणे कठीण असते. ही अडचण दूर करण्यासाठी आणि प्राणी कल्याणाचे काम अधिक सुलभ करण्यासाठी त्यांनी ‘म्यावमुंबई’ हे क्राऊडसोर्स्ड प्लॅटफॉर्म विकसित केले.”

हे व्यासपीठ एका परस्परसंवादी नकाशाप्रमाणे (इंटरॲक्टिव्ह मॅप) काम करते. मुंबईकर नागरिक जेव्हा रस्त्यावर एखादे मांजर पाहतील, तेव्हा ते या वेबसाइटवर त्या मांजराचे लोकेशन पिन करून त्याचा फोटो अपलोड करू शकतात. तसेच, त्या मांजराला वैद्यकीय मदतीची गरज आहे का किंवा ते दत्तक घेण्यायोग्य आहे का, याची माहितीही ते देऊ शकतात. रविवारी सार्वजनिक करण्यात आलेल्या या वेबसाइटवर आतापर्यंत १७० हून अधिक मांजरांची नोंद झाली आहे.

डेटाची अचूकता राखण्यासाठी बिर्ला यांनी या वेबसाइटमध्ये काही तांत्रिक सुरक्षा उपाय केले आहेत. यामध्ये मशिन लर्निंग मॉडेलचा वापर केला असून, केवळ मांजरांचेच फोटो अपलोड होतील याची खात्री केली जाते. मानवी चेहरे असलेले फोटो किंवा इतर अनावश्यक फोटो यात टाळले जातात.

मांजरांना दत्तक घेणे सोपे होणार

या वेबसाइटमुळे स्थानिक प्राणी कल्याण संस्थांना गरजू मांजरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना वेळीच उपचार किंवा दत्तक मिळवून देणे सोपे होणार आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या या माहितीमुळे भटक्या मांजरांच्या दीर्घकालीन आरोग्यावर लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याचे बिर्ला यांनी स्पष्ट केले.

समय रैनासह ५ कॉमेडियन्सना 'सर्वोच्च' दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणातील सर्व FIR रद्द

स्वातंत्र्यदिनाआधी दिल्ली उच्च न्यायालय, विमानतळासह अन्य ठिकाणी बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

'हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?' NALSAR प्रकरणात सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा BCI ला सवाल

ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

अल्पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न; ATS कडून आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश