मुंबई

पाकिस्तानवर कधीही विश्वास ठेवू नका! अमेरिकेच्या पुढाकाराने इराणवर हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू होऊन सुमारे दोन महिने झाले तरी होर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही रोखलेलीच असून याचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इस्रायलचे वाणिज्य दूत यानीव रेवाच यांनी सद्य:स्थितीवर महत्त्वाची माहिती दिली.

प्रतिनिधी

देवश्री भुजबळ

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू होऊन सुमारे दोन महिने झाले तरी होर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही रोखलेलीच असून याचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इस्रायलचे वाणिज्य दूत यानीव रेवाच यांनी सद्य:स्थितीवर महत्त्वाची माहिती दिली.

इराणची अणुक्षमता आणि लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा धोका नष्ट करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. इराणच्या अणु प्रकल्पाचे केंद्र जमिनीखाली खूप खोलवर असल्याने इस्रायली विमानांना ते पूर्णपणे नष्ट करता आले नाही. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून इराणी राजवट तिथून साहित्य वाचवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. इराण आणि त्यांचे समर्थक स्वतःला विजयी घोषित करत असले तरी तिथली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून त्यांच्याकडे कोणतीही मोठी पायाभूत सुविधा उरलेली नाही, असे रेवाच यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते इराणला भविष्यात अणु क्षमता राखता येणार नाही आणि समृद्ध युरेनियम तिथून बाहेर काढावे लागेल. युरेनियम सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेकडे किंवा रशियासारख्या तिसऱ्या देशात ते हस्तांतरित करण्याचा पर्याय सुरुवातीच्या चर्चेत समोर आल्याची माहिती वाणिज्य दूतांनी दिली. दरम्यान, कतार या संघर्षात दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याच्या वृत्तावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दहशतवादाला खतपाणी घालणारा देश मध्यस्थी कशी करू शकतो आणि अशा देशावर कसा विश्वास ठेवणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इराणवरील हल्ला इस्रायलने सुरू केला नसून त्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांचा पुढाकार होता आणि इस्रायल त्यात सामील झाला होता, असे सांगत शांतता कराराबाबत इस्रायल अमेरिकेच्या भूमिकेचे पालन करेल, असे ते पुढे म्हणाले.

इराणकडून पश्चिम आशियात अस्थिरता

इस्रायलचे इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनसोबत शांतता करार असून लेबनॉन सरकार आणि सौदी अरेबियासोबतही नुकतीच चर्चा झाली आहे. त्यामुळे पश्चिम आशियात शांतता शक्य असली तरी इराणची राजवट आणि त्यांचे हस्तक संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण करत असल्याचे रेवाच म्हणाले. या दहशतवादी संघटनांचा इराणसोबतचा संपर्क तोडणे गरजेचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा अंदाज लावण्यात आलेल्या अपयशाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून चौकशी पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या युद्धजन्य परिस्थितीला अडीच वर्षे पूर्ण होत आली असून सततच्या तणावामुळे नागरिक थकले आहेत आणि आता सर्वांना शांतता हवी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींचे अमित शहांना पत्र; पॅलेट गनबाबत विचारले तिखट प्रश्न

हा 'भाजप विरुद्ध भारत' असा संघर्ष; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, मुंबईत तरुणाईचा विजयी जल्लोष

परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्सची स्थापना; नंदन निलेकणी यांच्याकडे नेतृत्व; पंतप्रधानांची घोषणा

दिल्लीत जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळल्या

जि.प. निवडणुकांबाबत आज सर्वोच्च सुनावणी