स्वीटी भागवत/मुंबई
कुर्ला आणि बांद्रादरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या 'ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम' म्हणजेच पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या बांधकाम दर्जावर आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एका स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करणार आहे. संपूर्ण प्रकल्पादरम्यान निष्पक्ष आणि पारदर्शक काम व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या अभियंत्याची निवड निविदा प्रक्रियेद्वारे केली जाईल. ही व्यक्ती एमएमआरडीए आणि पॉड टॅक्सी उभारणाऱ्या कंत्राटदार एजन्सीपासून पूर्णपणे स्वतंत्र काम करेल. बांधकामाचा दर्जा, प्रकल्पाची प्रगती आणि सुरक्षितता यावर बारकाईने लक्ष ठेवून काही त्रुटी आढळल्यास ती अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर करेल. ८.८५ किलोमीटरचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवला जात असून यासाठी राज्य शासन किंवा एमएमआरडीएवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. उलट या प्रणालीद्वारे एमएमआरडीएला महसूल मिळणे अपेक्षित आहे.
साधारण दर २०० मीटरवर एक स्थानक
प्रवाशांच्या सुविधेसाठी या संपूर्ण मार्गावर साधारण दर २०० मीटरवर एक याप्रमाणे २२ वातानुकूलित स्थानके उभारली जातील. पहिला टप्पा ३.३६ किलोमीटरचा असेल, जो बांद्रा आणि कुर्ला यांना जोडेल. पहिल्या टप्प्यात कुर्ला-टर्मिनल स्टेशन, एलबीएस मार्ग, एमएमआरडीए पे अँड पार्क जी ब्लॉक, बीडीबी गेट-११, वांद्रे (पूर्व) - टर्मिनल स्टेशन, कलानगर, जुनी एमएमआरडीए इमारत, उत्पादन शुल्क विभाग ही स्थानके असतील.
पॉड ४० किमी वेगाने धावणार
ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. बॅटरीवर चालणाऱ्या या पॉड टॅक्सी स्वतंत्र उन्नत ट्रॅकवर चालतील. प्रत्येक पॉडमध्ये ६ प्रवासी बसू शकतील. या पॉडचा कमाल वेग ४० किमी प्रतितास असेल आणि दर १५ सेकंदांच्या अंतराने त्या उपलब्ध होतील. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवासी ज्या स्थानकाची निवड करतील, पॉड थेट त्याच स्थानकावर थांबेल.
त्यामुळे इतर स्थानकांवर वेळ न घालवता प्रवास वेगात पूर्ण होईल. प्रत्येक पॉड ३.९ मीटर लांब, २.०१ मीटर रुंद आणि १.८ मीटर उंच असेल. संपूर्ण यंत्रणेचे संचालन आणि सुरक्षेचे नियंत्रण मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून केले जाईल.
बीकेसीची कनेक्टिव्हिटी होणार मजबूत
बीकेसी हे मुंबईतील मुख्य व्यावसायिक केंद्र असल्याने हे उन्नत नेटवर्क थेट मेट्रो व रेल्वेला जोडेल. हा प्रकल्प 'मेट्रो लाईन ३' च्या बीकेसी स्थानकाशी आणि 'मेट्रो लाईन २बी' च्या आयटीओ व आयएल अँड एफएस स्थानकांशी जोडला जाईल. त्यामुळे रेल्वे, मेट्रो व पॉड टॅक्सी असा प्रवास सोपे होईल. देखभालीसाठी वांद्रे येथील आरएलडीएच्या जागेवर डेपो प्रस्तावित आहे.
२०३१ पर्यंत दररोज १.०९ लाख प्रवाशांचा अंदाज
प्रकल्प अहवालानुसार, २०३१ पर्यंत दररोज सुमारे १.०९ लाख प्रवासी या पॉड टॅक्सीचा वापर करतील असा अंदाज आहे. २०२२ च्या दरांनुसार याचा प्रस्तावित दर २१ रुपये प्रति किलोमीटर ठेवण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकल्प 'झिरो-कार्बन' संकल्पनेवर आधारित आहे, ज्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल.