गुरुवार (28 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभर गणपती विसर्जनाचा धुमधडाका होता. अशात मुंबईच्या मानाचा गणपती असलेला लालबागचा राजाच्या विसर्जनाकडे राज्यभरातील लोकांचं लक्ष लागलं होतं. गेल्या दहा दिवसात अनेक मोठ्या उद्योगपती, राजकीय नेते, मनोरंजन सृष्टीतील कलाकार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी (गुरुवारी) सकाळी साडेअकरा वाजता लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. यानंतर तब्बल २२ तासांनी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास मुंबईतील गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला.
मंडपातून बाहेर पडल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यानंतर जवळपास २२ तास वाजत गाजत लालबागच्या राजाची मिरवणूक रंगली. गुरुवारी सकाळी सुरू झालेली मिरवणूकीत ठिकठिकाणी राजाचं स्वागत झालं. राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात हळू हळू पुढे सरकत शुक्रवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटी येथे पोहोचला. यावेळी समुद्राला ओहोटी होती. त्यामुळे विसर्जनाला वेळ लागला. लालबागच्या राजासह अनेक गणपती रांगेत होते. समुद्राला भरती आल्यानंतर राजाला आधुनिक तराफ्यावर ठेवण्यात आलं.
राजाला आधुनिक तराफ्यावर ठेवल्यानंतर आरती करण्यात आली आणि नंतर तराफा खोल समुद्रात नेण्यात आला. कोळी बांधवांनी परंपरेनुसार राजाला बोटींची सलामी दिली. समुद्राच्या मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी होत्या. खोल समुद्रात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आलं.