Mumbai : यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासन सज्ज; भाविकांसाठी विविध सोयीसुविधा  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासन सज्ज; भाविकांसाठी विविध सोयीसुविधा

मुंबईची आराध्य देवता असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात परंपरेनुसार शारदीय नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईची आराध्य देवता असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात परंपरेनुसार शारदीय नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार आहे.

या निमित्ताने श्री महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने भुलाभाई देसाई मार्गावरील शोभा हॉटेल ते शीतल स्टोअरपर्यंत मंडप उभारणी केली आहे, तसेच रांगेत असणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मंदिरामध्ये डॉक्टरांचे पथक सज्ज असून प्रथमोपचार पेटीची तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्थाही मंदिर प्रशासनाने केली असून मंदिर परिसरात भाविकांसाठी पालिकेने सुलभ शौचालयाची व्यवस्थाही करून दिली आहे. पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था मंदिराच्या परिसरात मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

या उत्सव काळात सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गावदेवी पोलीस ठाणे यांच्यावर असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ताडदेव वाहतूक विभाग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येकांना सुरक्षा व्यवस्थेच्या अधीन राहून मेटल डिटेक्टरमधूनच प्रवेश करणे आवश्यक असून त्यांच्याकडे असलेल्या सर्व वस्तू व बॅग्ज, पर्स या स्कॅनरमधून स्कॅन करून घेणे आवश्यक असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

विविध यंत्रणांचे मोलाचे सहकार्य

उत्सव काळात भाविकांचे दर्शन सुलभ होण्याकरिता गावदेवी पोलीस ठाणे, ताडदेव पोलीस ठाणे, ताडदेव वाहतूक विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट तसेच अग्निशमन दल यांच्याकडून मोलाचा सहयोग असल्याचे मंदिराच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी नमूद केले आहे.

दर्शनाची व्यवस्था

उत्सव काळात श्रींच्या पूजेनंतर श्री महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी दररोज सकाळी ५.३० वाजता उघडणार असून, रात्री ११.०० वाजता बंद होईल. सकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत आरतीसाठी, दुपारच्या नैवेद्यासाठी १२.०० ते १२.२० पर्यंत, सायंकाळची धुपारती ०६.३० ते ०६.४० वाजेपर्यंत त्यानंतर सायंकाळच्या आरतीसाठी ०७.३० ते ०८.०० या काळात मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद राहील. तसेच आरती व नैवेद्याच्या तयारीकरिता मंदिर १० मिनिटे अगोदर बंद करण्यात येईल, असे मंदिर प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. या नवरात्रोत्सव काळात भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन आणि नियमांचे पालन करत आई जगदंबेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष बसेसची व्यवस्था

उत्सव काळात मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी भायखळा, मुंबई सेंट्रल तसेच दादर येथून विशेष बसेसची सोय बेस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पोलिसांव्यतिरिक्त अग्निशमन दल, मंदिराचे सेवेकरी, वैष्णव ट्रस्ट तसेच अनिरुद्ध बापू यांच्या संस्थेचे सेवेकरी भाविकांच्या व्यवस्थेसाठी उत्सव काळात तत्पर असणार आहेत.

७७ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

भाविकांसाठी रांगेची व्यवस्था करतानाच मंदिरासह लगतच्या परिसरातील संशयास्पद हालीचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ७७ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे संशयास्पद हालचालींवर नजर, चोर, खिसेकापू किंवा अन्य त्रासदायक वर्तन यावर त्वरित कारवाई करता येईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला