मुंबई

मुंबईतील लक्षवेधी लढत : वरळी, माहीममध्ये अटीतटीची झुंज; किंगमेकर कोण ठरणार, याची उत्सुकता कायम

राज्यातील २८८ मतदार संघात विधानसभा निवडणूक होत असली तरी देशाचे लक्ष मुंबईवर, मुंबईत ३६ मतदार संघात निवडणूक होत असली तरी वरळी व माहीममध्ये ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई : राज्यातील २८८ मतदार संघात विधानसभा निवडणूक होत असली तरी देशाचे लक्ष मुंबईवर, मुंबईत ३६ मतदार संघात निवडणूक होत असली तरी वरळी व माहीम मध्ये ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे तर माहीम मतदार संघात अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक पहिली नसली तरी मनसेचे संदीप देशपांडे आणि महायुतीचे मिलिंद देवरा यांचे आव्हान संपुष्टात आणणे आदित्य ठाकरेंसाठी मोठे चॅलेंज आहे. तर माहीम मतदार संघातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे प्रथमच विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे सन २०२४ ची विधानसभा निवडणुकीत वरळी आणि माहीम मतदार संघातील ही निवडणूक लक्षवेधी लढत ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. परंतु देशाच्या इतिहासात प्रथमच दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आमनेसामने उभे ठाकले आहेत. राज्यातील २८८ मतदार संघात निवडणूक होत असली तरी मुंबई काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी त्यामुळे मुंबईवर वर्चस्व निर्माण करणे यासाठी राजकीय पक्षांची घोडदौड सुरु आहे. मुंबईत एकूण ३६ मतदार संघ त्यापैकी काही मतदार संघात भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना यांचे वर्चस्व आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत खरी लढत ही ठाकरेंची असणार आहे.

वरळी मतदार संघ म्हणजे शिवसेनेचा गड, कोळी बांधव असो मराठी माणूस बहुतांश मतदारांचा कौल ठाकरेंच्या शिवसेनेला. मात्र यंदाच्या निवडणुकीत मनसेने संदिप देशपांडे यांना तर महायुतीने मिलिंद देवरा यांना रिंगणात उतरले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही निवडणूक तितकी सोपी नाही. महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांची मते आणि मनसेची मते याची विभागणी होणे तितके शक्य नाही. मात्र २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी ६७ हजार ४२७ मतांनी विजयी झाले होते. परंतु आता चित्र बदललंय. धनुष्यबाण आणि इंजिन ही दोन आव्हाने आदित्य ठाकरे यांच्या समोर उभी ठाकली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मिलिंद देवरा आणि संदिप देशपांडे ठक्कर देत विधानसभा गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभा लोकांसाठी नक्कीच चर्चेचा विषय ठरतो. ठाकरे शैलीतून सत्ताधारी असो वा विरोधक सगळ्यांचाच समाचार राज ठाकरे जाहीर सभेतून घेतात. मात्र वेळोवेळी राज ठाकरे यांची बदलती भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांसह लोकांच्या मनात नाराजी निर्माण करणारी झाली आहे. मनसेला मानणारा मोठा वर्ग असला तरी त्या वर्गाचे मतांमध्ये परिवर्तन झाले असे गेल्या काही निवडणुकांमध्ये जाणवले नाही. त्यात राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.

माहिम मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. तर महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर रिंगणात उतरले आहेच. भाजपने सदा सरवणकर यांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मनसेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र सदा सरवणकर यांचेही माहिम मतदार संघात स्थान आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांचीही मतदार संघात चांगली पकड आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून महेश सावंत यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे.

साम दाम दंड भेदचा वापर

विधानसभा निवडणुकीत विजयी वाटचाल करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. आपला उमेदवार जिंकलाच पाहिजे अशी रणनीती आखली आहे. उमेदवार निवडून यावा यासाठी यंदाच्या निवडणुकीत साम दाम दंड भेद याचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे बोलले जाते.

यामिनी जाधव यांची वर्चस्वाची लढाई

२०१९ च्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेतून उमेदवार म्हणून यामिनी जाधव निवडून आल्या होत्या. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक यामिनी जाधव यांच्यासाठी अगदीच सोपी आहे, असेही नाही. भायखळा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून यामिनी जाधव रिंगणात उतरल्या आहेत. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मनोज जामसुतकर यांचे तगडे आव्हान यामिनी जाधव यांना समोर असणार आहे. त्यामुळे भायखळा मतदार संघात कुठली शिवसेना बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ