राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या अंधेरीच्या पोटनिवडणूक संदर्भात एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही निवडणुकीला उभे राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय होईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे मत व्यक्त केले. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून पोटनिवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. भाजपचा उमेदवार मागे घ्यायचा की नाही याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.