आता जिल्हा रुग्णालयापर्यंत 'मानकांनुसार आरोग्यसेवा'; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा निर्णय प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

आता जिल्हा रुग्णालयापर्यंत 'मानकांनुसार आरोग्यसेवा'; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा निर्णय

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांचे सर्वसमावेशक मानक निश्चित केले आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांचे सर्वसमावेशक मानक निश्चित केले आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून ३०, ५०, १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर, सुश्रुषा सेवा, कुशल मनुष्यबळ, प्रयोगशाळा व रेडिओलॉजी सेवा, औषधे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्टता शासन निर्णयातून करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सेवा अधिक सुसूत्र होण्याबरोबरच नागरिकांना कोणत्या रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याची माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासकीय आरोग्यसेवेतील पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास वाढण्यास हातभार लागणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध स्तरावरील रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची विविध मानके एकत्रित करून रुग्णालयनिहाय सेवा निश्चित करण्यात आल्या आहेत. रुग्णालयाची खाट क्षमता आणि सेवा स्तर यानुसार तज्ज्ञ वैद्यकीय सेवा, नर्सिंग, अलाइड हेल्थ व पॅरामेडिकल मनुष्यबळ, प्रयोगशाळा सेवा तसेच इतर रुग्णसेवांचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत.

फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्रशल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंत शल्यचिकित्सक आदी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता रुग्णालयाच्या स्तरानुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शक्यतितक्या उपचारांसाठी रुग्णांना दूरच्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निदानात्मक चाचण्यांची स्पष्टता

निदानात्मक सेवांबाबतही शासन निर्णयात स्पष्ट मानके निश्चित करण्यात आली आहेत. ग्रामीण रुग्णालयांमध्ये ७६, १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ११० आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये १२२ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारे या तीन स्तरांवर मिळून ३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांबाबत स्पष्टता करण्यात आली आहे.

यात रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, विविध रक्त तपासण्या, यकृत व मूत्रपिंड कार्याच्या तपासण्या, लिपिड प्रोफाइल, HbA1C, थायरॉईड, पॅप स्मिअर, काही कर्करोगविषयक तपासण्या तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या तपासण्यांचा समावेश आहे.

एक्स-रेपासून एमआरआयपर्यंत रेडिओलॉजी सेवा

रुग्णालयाच्या स्तरानुसार एक्स-रे आणि सोनोग्राफीसारख्या रेडिओलॉजी सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित करण्यात आले आहे. १०० खाटांपेक्षा अधिक क्षमतेच्या रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅनची सुविधा, तर जिल्हा रुग्णालय स्तरावर एमआरआय सुविधेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स