विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार 
मुंबई

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार

शिवसेना उबाठा संसदीय पक्षात पडलेली फूट, खासदारांपाठोपाठ आमदार फुटीच्या शक्यतेने धरलेला जोर, पावसाने दडी मारल्याने राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला होत असलेला विरोध या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणारे राज्य पावसाळी विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

Swapnil S

मुंबई : शिवसेना उबाठा संसदीय पक्षात पडलेली फूट, खासदारांपाठोपाठ आमदार फुटीच्या शक्यतेने धरलेला जोर, पावसाने दडी मारल्याने राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, तीव्र पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी, पुण्यातील विषारी दारूने घेतलेले बळी, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला होत असलेला विरोध या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणारे राज्य पावसाळी विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना ठाकरे गटातील खासदार फुटीचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता असून याबद्दल विरोधकांकडून सत्तारूढ पक्षाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर' यशस्वी केले. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याने उबाठासह विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता दूर सारून अधिवेशनात एकजुटीने सत्ताधारी पक्षाशी दोन हात करण्याचे आव्हान विरोधकांसमोर आहे.

विरोधी पक्षाची आज बैठक

जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर सरकारला घेरण्याची तयारी करण्यासाठी विरोधी पक्षाची रविवारी बैठक होत आहे. या बैठकीत महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक राहण्याचा आणि चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

विरोधकांची सरसकट कर्जमाफीची मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती' योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेतील अटी, शर्ती जाचक असल्याची टीका होत असून विरोधी पक्षाने सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच पंढरपूर येथे आंदोलन केले. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही आंदोलन छेडले आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरसकट शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडीची शक्यता

या अधिवेशनात विधान परिषदेच्या नव्या उपसभापतींची निवड अपेक्षित आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक निकालाची अधिसूचना जारी झाल्यानंतर नव्या उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरू केली जाईल. माजी उपसभापती डॉ. नीलम गोडे यांची विधान परिषदेची मुदत गेल्या महिन्यात संपल्याने उपसभापती पद सध्या रिक्त आहे. डॉ. गोहे विधान परिषदेवर पुन्हा निवडून आल्याने उपसभापती पदावर त्यांची वर्णी लावली जाण्याची दाट शक्यता आहे.

अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे

  • पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै असे तीन आठवडे चालणार

  • लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना वगळण्याचा मुद्दा गाजणार

  • कांदा उत्पादक शेतकरी, कोकणातील बागायतदारांचे प्रश्न चर्चेला येणार

  • माहिती अधिकार कायद्यातील नव्या तरतुदी, नियमांना विरोधाची शक्यता

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन