Mumbai : मालाडमध्ये हिट अँड रन; इनोव्हा कारने ४ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, लग्नाच्या २० वर्षांनंतर झाला होता मुलगा  
मुंबई

Mumbai : मालाडमध्ये हिट अँड रन; इनोव्हा कारने ४ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, लग्नाच्या २० वर्षांनंतर झाला होता मुलगा

अपघातानंतर कार काही क्षण थांबली, मात्र चालकाने जखमी मुलाला रुग्णालयात न नेता केवळ वॉचमनला घटनेची माहिती दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मालाड पूर्वेतील निलयोग विराट इमारतीत राहणाऱ्या सिंग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (दि.७) दुपारी साडेचारच्या सुमारास लक्ष सिंग इमारतीखाली खेळत होता. त्याचवेळी काळ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा कार भरधाव वेगात आली आणि त्या कारने अवघ्या ४ वर्षांच्या लक्षला चिरडले.

अपघातानंतर कार काही क्षण थांबली, मात्र चालकाने जखमी मुलाला रुग्णालयात न नेता केवळ वॉचमनला घटनेची माहिती दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

लग्नाच्या २० वर्षांनी एकुलत्या एक मुलाचा जन्म

मृत लक्षचे वडील जयप्रकाश सिंग यांनी सांगितले की, लग्नाच्या २० वर्षांनंतर त्यांना हा मुलगा झाला होता. लक्ष हा त्यांचा एकुलता एक आणि लाडका मुलगा होता. "कारचालकाने थोडी माणुसकी दाखवून माझ्या मुलाला लगेच रुग्णालयात नेले असते, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता," असे त्यांनी दु:ख व्यक्त करत सांगितले.

पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबाचा रोष

माहितीनुसार, या प्रकरणात कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. आरोपीला लगेच हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले, मात्र पोलिसांनी त्याची कस्टडी मागितली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपीला जामीन मिळण्याची शक्यता असल्याचे समजताच कुटुंबीयांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी जामीन प्रक्रिया थांबवली.

आरोपी अटक; हिट अँड रनचा गुन्हा दाखल

कुटुंबीयांच्या मागणीनुसार, या प्रकरणी 'हिट अँड रन' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, कारने लक्षला चिरडल्यानंतर काही अंतरापर्यंत त्याला फरफटत नेले. अपघातानंतर जखमी लक्षला सुरक्षारक्षक उचलून घेऊन गेला, असेही त्यांनी सांगितले.

दिंडोशी पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपी रमेश देवजी जतरारा याला अटक केली आहे. तो निलयोग विराट इमारतीत कार पार्क करायचा, मात्र तो तेथील रहिवासी नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, फुटेजमध्ये कार मुलाला चिरडल्यानंतर थांबताना, त्यानंतर वॉचमन मुलाला उचलून नेताना आणि लगेचच कारचालक इनोव्हा घेऊन पळून जाताना स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन; शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क; सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

भारताला तेल दिलासा; प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

Thane : पुलाचा लोखंडी सांगाडा कारवर कोसळला; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड