Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी 
मुंबई

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी

मुंबई एसी लोकलमध्ये मराठी भाषेवरून टीसी आणि प्रवाशामध्ये वाद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला RPF कार्यालयात दोन तास बसवून ठेवल्याचा आरोप असून, पश्चिम रेल्वेने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

Mayuri Gawade

मुंबईतील वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये तिकीट तपासनीस (टीसी) आणि एका प्रवाशामध्ये मराठी भाषेवरून झालेल्या वादाचे प्रकरण आता चर्चेचा विषय ठरले आहे. मराठीत संवाद साधण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रवाशाला अंधेरी रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कार्यालयात सुमारे दोन तास बसवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने संबंधित तिकीट तपासनीसांवर कारवाईची मागणी केली असून, व्हायरल व्हिडीओची आणि संपूर्ण घटनेची प्राथमिक चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एसी लोकलमध्ये नेमकं काय घडलं?

शनिवारी (दि. ११) दुपारी विरार-चर्चगेट एसी लोकलने मीरा रोडहून दादरकडे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडे तिकीट तपासनीसाने हिंदीत तिकीटाची विचारणा केली. त्यावर त्यांनी पास दाखवत, "महाराष्ट्रात काम करता, तर मराठीत संवाद साधा," अशी विनंती केल्याचे सांगितले जाते. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.

वाद वाढत असताना आणखी काही तिकीट तपासनीस तेथे आले. त्यापैकी मराठी भाषिक एका कर्मचाऱ्याने मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या प्रवाशालाच सुनावल्याचा आरोप आहे. तसेच "व्हॉट्सअ‍ॅप मराठीत वापरता का?" असा सवाल करत मराठी बाराखडी म्हणून दाखवल्याचाही दावा करण्यात आला आहे. यादरम्यान प्रवासी आणि तिकीट तपासनीस दोघांनीही मोबाईलवर या घटनेचे चित्रीकरण केले.

अंधेरीत उतरवून दोन तास बसवून ठेवल्याचा आरोप

संबधित प्रवाशांनी आरोप केला की, त्यांना दादरला जायचे असतानाही तीन तिकीट तपासनीसांनी अंधेरी स्थानकावर उतरवले. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याची धमकी देत त्यांना आरपीएफ कार्यालयात सुमारे दोन तास बसवून ठेवण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली.

समितीची कारवाईची मागणी

या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांकडे लेखी निवेदन देत संबंधित तिकीट तपासनीसांवर कारवाईची मागणी केली आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, मराठीत संवाद साधण्याचा आग्रह धरणे हा सरकारी कामात अडथळा ठरत नाही. मात्र, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता प्रवाशाला आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवण्यात आल्याने त्याच्या भाषिक आणि नागरिक हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप समितीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणीही समितीने केली आहे.

पश्चिम रेल्वेने काय सांगितले?

या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही याची दखल घेतली आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर व्हिडीओची आणि संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन्ही पक्षांनी अंधेरी शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) ठाण्यात कारवाईची मागणी केली आहे. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर निष्कर्षांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

ठाण्यात 'एसआयआर'ची गती मंद; ७४.५० लाख मतदारांपैकी केवळ २८ टक्क्यांपर्यंतच BLO पोहोचले

शिक्षकांमागे अशैक्षणिक कामांचा ससेमिरा; सरकारी शाळांपुढे अस्तित्वाचे संकट

Nandurbar : शासकीय वसतिगृहात अन्नातून विषबाधा? ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नाचे नमुने तपासणीसाठी

Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार