भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेतील गोंधळाचे वार्तांकन करताना दोन पत्रकारांना मारहाण, धक्काबुक्की आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्याकडे केली. मात्र, या तक्रारीचा अन्य गुन्ह्यांसोबत तपास केला जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
१६ सप्टेंबर रोजी महानगर पालिकच्या महासभेदरम्यान भाजपचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येते. महासभेचे थेट ऑनलाइन प्रक्षेपण करावे, अशी मागणी करणाऱ्या नागरिक आणि पत्रकारांना या वेळी मारहाण व धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे.
घटनेचे चित्रीकरण करताना पत्रकार जतिन दाधीच आणि मयूर ठाकूर यांना अडवून मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. दाधीच यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा, तसेच त्यांना सभागृहातून बाहेर नेताना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारात सोन्याचे ब्रेसलेट आणि घड्याळ गहाळ झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. सर्व प्रकरणांचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करीत आहेत. पत्रकारांवरील कथित हल्ल्याबाबत पोलिसांची अधिकृत बाजू उपलब्ध झालेली नसून, पुढील तपास आणि कारवाईकडे लक्ष लागले आहे.
भाजपच्या १६ नगरसेवकांवर गुन्हा
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत झालेल्या गोंधळाप्रकरणी भाजपच्या १६ नगरसेवकांसह पदाधिकारी आणि अन्य व्यक्तींविरोधात भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ते करण पवार यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे, महिला नगरसेविका शानू गोहिल यांच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात विनयभंगाचा, तर पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महासभेचे
मोबाईलवर चित्रीकरण करण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येते. पत्रकारांचे मोबाईल हिसकावून त्यांचे नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. करण पवार यांच्या तक्रारीत शानू गोहिल, अॅड. तरुण शर्मा यांच्यासह भाजपच्या १६ नगरसेवकांची नावे आहेत. तर गोहिल यांच्या तक्रारीवरून करण पवार, अॅड. कृष्णा गुप्ता आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांच्या तक्रारीवरूनही काही नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.