भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय पदाशी संबंधित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संपूर्णपणे हिंदी भाषेत छापण्यात आल्याने मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याचबरोबर पत्रिकेतील नावांचा क्रम आणि भाजपच्या अंतर्गत प्रोटोकॉलबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य अपेक्षित असताना महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यक्रमाची पत्रिका हिंदीत छापल्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. परिवहन सभापतींना मराठीचा विसर पडला आहे का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, निमंत्रण पत्रिकेतील नावांच्या क्रमावरून भाजपमधील अंतर्गत प्रोटोकॉलबाबतही चर्चा सुरू झाली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव पत्रिकेत सर्वांत खाली देण्यात आल्याने पक्षाच्या प्रोटोकॉलचे पालन झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय भाजपचे स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत यांच्या नावाचा उल्लेख ‘हसमुख महलोत’ असा करण्यात आला आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे नाव छापताना पडताळणी करण्यात आली नाही का, अशी टीकाही होत आहे.
भाषेचा मुद्दा, प्रोटोकॉलचा कथित भंग आणि नावातील चुका यामुळे उद्घाटन सोहळ्यापूर्वीच परिवहन सभापती राजकुमार मिश्रा अडचणीत आले असून, यावर त्यांची आणि महापालिका प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.
निमंत्रण पत्रिकेतील नावांच्या क्रमावरून भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि विसंवादाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे नाव पत्रिकेत सर्वांत खाली छापण्यात आले असून, इतर पदाधिकाऱ्यांची नावे त्यांच्यापेक्षा वर देण्यात आली आहेत.