Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल  
मुंबई

Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल

स्वातीवर तिचा पती आणि कुटुंबीय सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. त्याचबरोबर, प्रभू चाटे पत्नीवर संशय बाळगत होता आणि तिच्या गर्भातील बाळाच्या पितृत्वावरही शंका घेतल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नोंदवण्यात आला आहे.

Mayuri Gawade

मीरा रोडमध्ये एका १९ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मायक्रो-रेक्रूटमेंटद्वारे निवड झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीनं आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याच्या आई-वडिलांवर आणि एका नातेवाईकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

लग्नाला सात महिने; सतत छळ होत असल्याचा आरोप

स्वाती चाटे आणि प्रभू चाटे या दाम्पत्याचं लग्न एप्रिल २०२५ मध्ये झालं होतं. लग्नानंतर दोघंही मिरा रोडमधील लक्ष्मी पार्क परिसरात राहत होते. प्रभू चाटे हे २०२३ च्या मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस भरतीत निवड झालेले कॉन्स्टेबल असून ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत.

पीटीआयच्या माहितीनुसार, स्वातीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, स्वातीवर तिचा पती आणि कुटुंबीय सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. त्याचबरोबर, प्रभू चाटे पत्नीवर संशय बाळगत होता आणि तिच्या गर्भातील बाळाच्या पितृत्वावरही शंका घेतल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नोंदवण्यात आला आहे.

वाद, तणाव आणि शेवटचा फोन

लग्नानंतर केवळ काही दिवसांतच दोघांमध्ये वाद वाढू लागले. प्रभूचे मद्यपान, संशयाची सवय आणि कुटुंबीयांकडून होणारा छळ यामुळे स्वाती भावनिकदृष्ट्या खचत चालली होती. २७ नोव्हेंबर रोजी पतीसोबत फोनवर झालेल्या वादानंतर स्वातीने आपल्या आईला कॉल करून, "मी हे सहन करू शकत नाही… मी आत्महत्या करेन," असे सांगितल्याचे आईने तक्रारीत नमूद केले आहे.

त्यानंतर आईने तातडीने प्रभूला फोन करून स्वातीची चौकशी करण्यास सांगितले. प्रभू घरी परतला असता स्वातीने गळफास घेतल्याचे आढळले.

चार जणांविरोधात गुन्हा; पतीला पोलीस कोठडी

स्वातीच्या आईच्या तक्रारीवरून मिरा रोड पोलीस ठाण्यात प्रभू चाटे, त्याची आई रंजना चाटे, वडील भगवान चाटे आणि नणंद पुष्पा सनाप यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी प्रभूला अटक केली असून न्यायालयाने त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास मिरा रोड पोलीस करत आहेत.

LPGची टंचाई नाही! छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती; राज्यात इंधन पुरवठा सुरळीत

अमेरिकेत अंतर्गत धुसफूस; ‘इराणकडून धोका नव्हता’ असे सांगत अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखाचा राजीनामा

LPG घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

आजचे राशिभविष्य, १८ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

युद्धस्य तु कथा रम्या..!