मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसेसच्या अपघाताचे प्रमाण वाढले असताना कंत्राटी बसचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सुमारे दीड वर्षात तब्बल ८९८ चालकांनी बेदरकारपणे गाडी चालवली असून त्यात बेस्टच्या १०९, तर ७८९ कंत्राटी चालकांचा समावेश आहे.
जानेवारी २०२५ ते मे २०२६ या कालावधीत एकूण ८९८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बेस्टचे १०९ चालक तर वेट लीज (कंत्राटी) बसचे ७८९ चालक यांचा समावेश आहे. कारवाईत एकूण ८७४ प्रकरणे वेट लीज चालकांशी संबंधित असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
अशी झाली कारवाई
काही प्रकरणांत चालकांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले, तर काहींना ‘सेन्सर्ड’ किंवा ‘कॉशन’ देण्यात आले. सांताक्रुझ आगारातील एका प्रकरणात वेट लीज ऑपरेटरवर तब्बल ९.७२ लाख रुपयांचा दंड लागू करण्यात आल्याची नोंद आहे.
मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बसेसची जगभरात ओळख आहे. बेस्ट बसेसच्या माध्यमातून दररोज २५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून आजही प्रवासी बेस्ट बसेसना पसंती देतात. मात्र, गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावरील बसेसचा शिरकाव झाला असून वेट लीजच्या बसेसचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे तर दुसरीकडे बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या भाडेतत्त्वावरील बस चालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचे आढळले आहे.
ताकीद आणि दंड
बेस्ट प्रशासनाने विविध आगारांतील भरधाव वाहनचालकांवर निलंबन, ताकीद, सावधगिरीचा इशारा, चौकशी तसेच संबंधित कंत्राटदारांमार्फत दंडात्मक कारवाई केली आहे. काही प्रकरणांत चालकांना निलंबित करण्यात आले असून काहींवर आर्थिक दंडही आकारण्यात आला आहे. आकडेवारीनुसार सांताक्रुझ (एसएनडी) आगारात सर्वाधिक ३२४ प्रकरणे नोंदली गेली. त्यापाठोपाठ माहीम ५०, मजास ४६, कुलाबा ४३, गोरेगाव ३१, तर धारावी आगारात २३ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
कालावधी : जानेवारी २०२५ ते मे २०२६
एकूण कारवाई : ८९८
बेस्ट चालक : १०९
वेट लीज चालक : ७८९
सर्वाधिक प्रकरणे : सांताक्रुझ (३२४)
कारवाईचे प्रकार : निलंबन, समज, सावधगिरीचा इशारा, दंड, चौकशी