मुंबई : राज्य शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत पुढील पाच वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात परवडणारी गृहनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, भाडेतत्त्वावरील घरे उभारली जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ५३५४ सदनिका व ७७ भूखंड विक्रीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे पश्चिम येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय लॉटरी काढण्यात आली. यावेळी शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत सुमारे दोन कोटी घरांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समूह पुनर्विकास प्रकल्पांना चालना दिली जात आहे. रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने म्हाडा, सिडको, एमएम आरडीए, एमआयडीसी, बृहन्मुंबई महानगरपालिका या संस्थांवर सोपवली आहे. या निर्णयामुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळणार असून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन शक्य होणार आहे.
शिंदे म्हणाले की, गृहनिर्माण धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर हा रखडलेला प्रकल्प या नवीन धोरणामुळे मार्गी लागला असून १७हजार झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. पुढील पाच वर्षांत गृहनिर्माण क्षेत्रात खासगी व शासकीय संस्थांच्या माध्यमातून सुमारे ५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ३५ लाख घरांची उभारणी केली जाणार आहे. केंद्र शासनाने वस्तू व सेवा करात कपात केल्यामुळे घरांच्या किमती कमी होण्यास मदत होणार असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. एमएमआर ग्रोथ हब अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशात सन २०३० पर्यंत ३० लाख घरांच्या उभारणीचे उद्दिष्ट असून त्यातील सुमारे आठ लाख घरे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या म्हाडामार्फत होते.
उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मुंबई व मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून गृहनिर्मितीसाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सह मुख्य अधिकारी उमेश वाघ, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर, मुंबई मंडळाच्या सह मुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुंबईमध्ये २ लाख घरे लॉटरीसाठी उपलब्ध होणार
म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास वेगाने सुरू आहे. या माध्यमातून आगामी पाच ते सहा वर्षांत २ लाख घरे लॉटरीसाठी उपलब्ध होतील, अशी घोषणा 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी प्रास्ताविक भाषणात केली. ते म्हणाले की, म्हाडा कोकण मंडळातर्फे गेल्या तीन वर्षांतील ही चौथी संगणकीय लॉटरी असून १३ हजार ५०० घरे या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हाडाने गेल्या तीन वर्षांत पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ४१,५०० सदनिका सोडतीद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. एमएमआर ग्रोथ अंतर्गत सन २०३० पर्यंत म्हाडाच्या माध्यमातून सुमारे आठ लाख घरे उभारणीची उद्दिष्टपूर्ती करणे शक्य असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. सुमारे वीस हजार गिरणी कामगारांना आतापर्यंत घरे मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.