मुंबई : मुंबईतील हवेच्या प्रदूषणाचे स्रोत शोधण्यासाठी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) यावर आधारित ‘डायनॅमिक मॉनिटरिंग’ यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही यंत्रणा पूर्णपणे आयओटी व एआय आधारित नसल्यास हवेच्या गुणवत्तेचे प्रभावी निरीक्षण शक्य होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत स्पष्ट केले. रिअल-टाइममध्ये प्रदूषणाचे स्रोत ओळखून तत्काळ सुधारात्मक कारवाई करण्यासाठी अशी प्रणाली आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित झाला असता, अनिल परब यांनी वांद्रे येथील खेरवाडी भागात हवेच्या वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. विविध बांधकामे आणि पायाभूत प्रकल्पांची कामे हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इतर सदस्यांनीही राज्यातील विविध भागांत वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पातळीबाबत चिंता व्यक्त केली. या चर्चेला उत्तर देताना पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी काही मोबाईल अॅप्सवर उपलब्ध असलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स डेटामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणले. नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (सीपीसीबी) प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असा सल्ला त्यांनी दिला. हिवाळ्यातील हवामान आणि आर्द्रतेमुळे सकाळच्या वेळेत मुंबईत धुरकटपणा अधिक जाणवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण व्यवस्थापन मजबूत करण्यास कटिबद्ध
प्रगत निरीक्षण प्रणालीच्या दिशेने होत असलेल्या हालचालींना पाठिंबा देताना मुंडे यांनी एआय आधारित तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास ट्रॅकिंगची कार्यक्षमता आणि अचूकता मोठ्या प्रमाणात वाढेल, असे मत व्यक्त केले. चर्चेदरम्यान हस्तक्षेप करताना फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, सरकारी तसेच खासगी पायाभूत प्रकल्पांसह सर्व प्रदूषण स्रोतांचा मागोवा घेऊ शकणारी पूर्णतः डायनॅमिक प्रणाली उभारण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत. ‘जोपर्यंत प्रणाली १०० टक्के आयओटी आणि एआय आधारित होत नाही, तोपर्यंत प्रभावी निरीक्षण शक्य होणार नाही. आम्ही स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याची खात्री करू, असे सांगत त्यांनी राज्यातील पर्यावरण व्यवस्थापन मजबूत करण्याबाबत सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली.
हवा गुणवत्तेचे निरीक्षण करणारी यंत्रणा कार्यरत
परब यांनी मांडलेल्या तक्रारीची दखल विभागाने घेतली असून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुंडे यांनी सभागृहाला दिली. सध्या मुंबईत ३२ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणारी यंत्रणा कार्यरत असून, त्याद्वारे ‘एक्यूआय’ डेटा संकलित केला जात आहे. याशिवाय, बीएमसीकडून विविध ठिकाणी उपकरणे बसवली जात असून ती रिअल-टाइम डेटा संबंधित वॉर्ड कार्यालयांना पाठवणार आहेत. हा डेटा बीएमसीच्या डॅशबोर्डवर एकत्रित करण्याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे वॉर्ड पातळीवर प्रदूषण ‘हॉटस्पॉट्स’ ओळखणे आणि केंद्रित कारवाई करणे शक्य होईल.