मुंबई : मुंबईतील रिक्षाचालक वारंवार अल्प अंतराच्या प्रवासासाठी प्रवासी घेण्यास नकार देत असल्याच्या दीर्घकालीन समस्येवर तोडगा काढण्यासाठी, मुंबई रिक्षाचालक युनियनने एक नवीन मोबाईल ॲप सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या ॲपद्वारे प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासह उपनगरीय भागात सेवा अधिक सुलभ होईल, असे युनियनचे म्हणणे आहे.
महासचिव थंपी कुरियन यांच्या नेतृत्वाखालील या युनियनने अलीकडेच मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण आणि अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात ॲप हे प्रवाशांसाठी उपयुक्त, पारदर्शक आणि नियमांचे पालन करणारे पर्याय असल्याचे सांगण्यात आले आहे.
ड्रायव्हर्ससाठी हे ॲप परवडणारे राहावे म्हणून युनियनने दररोज ₹२५ किंवा कमी दरातील मासिक वर्गणीचा प्रस्ताव दिला आहे, जेणेकरून तंत्रज्ञान वापरणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरू नये. कुरियन यांनी त्यांच्या प्रस्तावात हेही अधोरेखित केले की, प्रवासी रद्द करत असल्यामुळे चालकांना ५००-७०० मीटरचा प्रवास वाया जातो, यामुळे त्यांचे इंधन, वेळ आणि मेहनत वाया जाते.
त्यावर उपाय म्हणून रेल्वे स्थानकांवरील प्रीपेड ऑटो योजनेसारखीच एक प्रोत्साहन योजना राबवण्याची सूचनाही युनियनने दिली आहे, जिच्याद्वारे अशी नुकसानभरपाई दिली जाऊ शकते.
युनियनने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत धोरणात्मक रूपरेषा, रद्दीकरण भरपाई आणि प्रोत्साहन रचना अंतिम करण्यासाठी औपचारिक बैठकीची मागणी केली आहे.
प्रस्तावित ॲपमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या सुविधा :
प्रवासी आधीच रिक्षा बुक करू शकतील, त्यामुळे रिक्षा नाकारण्याच्या घटना कमी होतील.
सर्व भाडे फक्त मीटरप्रमाणे असेल, जे प्राधिकरणाने ठरवलेल्या दरांनुसार असेल, ज्यामुळे पारदर्शकता आणि अति भाडे टाळले जाईल.
प्रत्येक प्रवासाचे डिजिटल रेकॉर्ड तयार होईल व सुरक्षितपणे संग्रहित केले जाईल. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढेल आणि चालकांची जबाबदारी निश्चित होईल.
महिलांसाठी विशेष ‘पिंक ऑटो’ सुविधा असेल, जी उपलब्धतेनुसार बुक करता येईल, त्यामुळे महिलांमध्ये अधिक विश्वास निर्माण होईल.
प्रवास रद्द झाल्यास चालकाला लगेच सूचना मिळेल, त्यामुळे गोंधळ आणि वेळेची नासाडी टळेल.