Mumbai : 'आता आम्हाला आई-बाबा कोण म्हणणार?'; वांद्र्यात न्युट्रिशनिस्टच्या कारने ८ वर्षीय चिमुरड्याला चिरडले, पालकांचा आक्रोश 
मुंबई

Mumbai : 'आता आम्हाला आई-बाबा कोण म्हणणार?'; वांद्र्यात न्युट्रिशनिस्टच्या कारने ८ वर्षीय चिमुरड्याला चिरडले, पालकांचा आक्रोश

घटनेनंतर एका रिक्षाचालकाने जखमी अंशला उचलून रिक्षात ठेवले आणि तातडीने वांद्रे पश्चिम येथील होली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : वांद्रे पश्चिम येथे रविवारी (दि. ३०) दुपारी एसयूव्हीच्या धडकेत ८ वर्षीय अंश गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. न्युट्रिशनिस्ट मेघना रावलच्या कारने अंशला धडक दिल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी रावल यांना अटक केली आहे. या दुर्घटनेत एकुलता एक मुलगा गमावलेल्या अंशच्या आई-वडिलांनी आक्रोश करत 'आता आम्हाला आई-बाबा कोण म्हणणार?' असा सवाल केला असून, न्यायाची मागणी केली आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा पोलीस तपास सध्या सुरू आहे.

तो रस्त्याच्या कडेला चालत होता अन्...

माध्यमांशी बोलताना अंशच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या आठवणींना उजाळा देत न्यायाची मागणी केली. "आता आम्हाला पप्पा आणि मम्मी कोण म्हणणार? आम्हाला न्याय हवा आहे. माझा मुलगा रस्त्याच्या कडेला चालत होता. कारने त्याला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला," असे त्यांनी सांगितले.

"माझा एकुलता एक मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला गेला. आता मी काय करू? मला फक्त न्याय हवा आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्याचे वडील अरविंद गुप्ता यांनी दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आपण घटनास्थळी पोहोचलो, असेही त्यांनी सांगितले.

अपघात कसा घडला?

पोलिसांच्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील जिजामाता उद्यानाजवळील सेंट जॉन बॅप्टिस्ट रोडवर रविवारी दुपारी सुमारे २.१५ ते २.३०च्या दरम्यान हा अपघात झाला. हा रस्ता माउंट मेरी चर्चच्या दिशेने जातो.

काडेश्वर परिसरात राहणारा अंश खेळण्यासाठी उद्यानात गेला होता. खेळून घरी परतताना रस्ता ओलांडत असताना मेघना रावल चालवत असलेल्या इनोव्हा हायक्रॉस एसयूव्हीने त्याला धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर एका रिक्षाचालकाने जखमी अंशला उचलून रिक्षात ठेवले आणि तातडीने वांद्रे पश्चिम येथील होली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दुपारी सुमारे ३.४५ वाजता त्याला मृत घोषित केले.

चालक महिलेवर गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर मेघना रावलला ताब्यात घेऊन अटक केले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५, २८१ आणि १२५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक महिलेवर गंभीर आरोप

मेघना रावल वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्याचा आणि वाहन वेगाने चालवत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या दाव्यांची पोलीस पडताळणी करत आहेत. तसेच, एसयूव्हीची आरटीओच्या तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार असून, अपघाताची नेमकी कारणे आणि परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.

कुटुंबीयांकडून चालक महिलेवर गंभीर आरोप करण्यात आले असले तरी, अपघाताची नेमकी परिस्थिती आणि संबंधित आरोप तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत

Mumbai : पालिका सुधार समितीत महायुतीत खदखद; भाजप नगरसेवकांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार

शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; घर आणि शाळा यांच्यात समन्वय वाढ‌वणार, वर्षातून चार वेळा आयोजन

Mumbai : ‘डोंगरीचा राजा’, ‘धारावीचा चिंतामणी’चे उत्साहात आगमन; ढोल-ताशांचा गजर, भाविकांची गर्दी

Mumbai : पाणी तुंबण्याची समस्या दूर होणार; मिलन सबवेच्या धर्तीवर मानखुर्द सबवेत पंपिंग स्टेशन उभारणार, १४ कोटी खर्च करणार