Mumbai : बेस्टच्या ताफ्यात १,५०० नव्या बसेस; BEST समितीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : बेस्टच्या ताफ्यात १,५०० नव्या बसेस; BEST समितीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी

प्रवाशांना अधिक चांगली सेवा उपलब्ध करून देतानाच बेस्टमधील कायमस्वरूपी कर्मचारी तसेच कंत्राटी चालक-वाहकांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आले.

Swapnil S

मुंबई : प्रवाशांना अधिक चांगली सेवा उपलब्ध करून देतानाच बेस्टमधील कायमस्वरूपी कर्मचारी तसेच कंत्राटी चालक-वाहकांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीत १२ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर १,५०० मिडी एसी बस घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

तसेच संबंधित कंपन्यांना स्वीकृतीपत्र देणे व करारावर स्वाक्षरी करण्यासही समितीने हिरवा कंदील दिला. १५० डबल डेकर बसेससह पाच ओपन डेक बसेस दिवाळीपर्यंत आणण्याचे नियोजन असल्याचे बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले.

बेस्ट बस ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी बेस्ट बसेसद्वारे प्रवास करून इच्छित स्थळ गाठतात.

बेस्ट उपक्रमाकडे सध्या २,८०० हून अधिक बसेस असून वाढती प्रवासी संख्या, मेट्रो मार्गांचे विस्तारलेले जाळे आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी बसेसच्या ताफ्यात मोठी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १,५०० मिडी एसी बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सुमारे ७,०२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या बस केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राइव्ह योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहेत. भविष्यात बेस्टचा एकूण बसताफा १० हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

या निर्णयांमुळे एकीकडे मुंबईकरांना अधिक बससेवेचा लाभ मिळणार असून दुसरीकडे बेस्टच्या हजारो कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आर्थिक दिलासा मिळणार आहे.

कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ

बेस्टच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटी चालक-वाहकांनाही समितीने मोठा दिलासा दिला. २०२१ ते २०२६ या कालावधीतील प्रलंबित वेतन कराराच्या अधीन राहून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना जून २०२६ पासून दरमहा ३,००० रुपयांची अंतरिम वेतनवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. जून महिन्याची थकबाकी आणि जुलै महिन्याची वाढ अशा एकूण ६,००० रुपयांची रक्कम ऑगस्ट महिन्यातील वेतनासोबत दिली जाणार आहे. तसेच कंत्राटी चालक आणि वाहकांनाही दरमहा २,००० रुपयांची अंतरिम वाढ देण्याचा निर्णय समितीने मंजूर केला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

Ganeshotsav 2026 : 'मुंबईचा राजा' चा यंदा अनोखा विसर्जन सोहळा; २२ फुटांचा गणराया जहाजाने खोल समुद्रात जाणार

Pune : गणपती विसर्जनासाठी वाहतूकीत मोठे बदल; ४८ तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी, १७ प्रमुख रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण