मुंबई : भाडेतत्त्वावरील (वेट लीज) बसगाड्यांमुळे बेस्ट उपक्रमाला अपेक्षित उत्पन्नापेक्षा अधिक आर्थिक भार सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आणि बसगाड्यांच्या कार्यक्षमतेसह रस्ते सुरक्षेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करण्यात येणार असून, विद्यमान कंत्राटांचाही फेरआढावा घेतला जाणार आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान ही माहिती दिली.
मुंबईसह महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि विस्तारणारे बससेवेचे जाळे लक्षात घेता आगामी काही वर्षांत बेस्टला तब्बल १३ हजार बसगाड्यांची आवश्यकता भासणार आहे. यापूर्वी २०२८ पर्यंत १० हजार बसगाड्या उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, आता ही गरज आणखी वाढल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले.
सध्या कंत्राटदारांना निश्चित किलोमीटरच्या आधारे पैसे दिले जातात. मात्र, काही कंत्राटांमधील त्रुटींमुळे बेस्टच्या आर्थिक कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याने अटी अधिक कठोर करण्याचा विचार आहे.
२,३५२ कोटींची ग्रॅच्युइटी देणी प्रलंबित
बेस्ट बस डेपोंचा कायापालट योजनेंतर्गत आगार पुनर्विकासातून मिळणाऱ्या उत्पन्नाला कर्मचाऱ्यांची थकबाकी आणि बसखरेदीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. मार्च २०२७ पर्यंतची २ हजार ३५२ कोटी रुपयांची ग्रॅच्युइटी देणी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बेस्टच्या भविष्यातील वाटचालीसाठी श्वेतपत्रिका आणि पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्याची गरजही सेठी यांनी व्यक्त केली.