मुंबई

BMC Mayor : महायुतीत निवडणूक लढली, पण नोंदणी वेगळी; आज कोकण भवनात भाजप आणि शिंदे सेना 'स्वतंत्र' गटनोंदणी करणार

महायुती म्हणून निवडणूक लढवलेल्या भाजप आणि शिंदे सेनेचे नगरसेवक एकत्र नोंदणी करतील, अशी चर्चा गेल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. मात्र मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी स्पष्ट केले की, भाजप आणि शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करणार आहेत.

Mayuri Gawade

मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन पंधरा दिवस उलटले असतानाही सत्तास्थापनेचे गणित अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. अशातच आज (दि. २) भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आपापल्या निवडून आलेल्या नगरसेवकांची नोंदणी स्वतंत्र गट म्हणून कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे करणार आहेत. त्यापूर्वी आज भाजपच्या गटनेतेपदी दहिसरमधून निवडून आलेले नगरसेवक गणेश खणकर यांची निवड करण्यात आली आहे.

महायुती म्हणून निवडणूक लढवलेल्या भाजप आणि शिंदे सेनेचे नगरसेवक एकत्र नोंदणी करतील, अशी चर्चा गेल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. मात्र मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी 'फ्री प्रेस जर्नल'शी बोलताना स्पष्ट केले की, भाजप आणि शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि इतर पक्षांनी निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच कोकण आयुक्तांकडे गटनोंदणी पूर्ण केली होती. भाजप आणि शिंदे सेनेची नोंदणी मागील गुरुवारी होणार होती. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात जाहीर झालेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

महापौरपद, स्थायी समितीही भाजपकडे जाण्याची शक्यता

शिंदे सेनेने अद्याप महापौर आणि स्थायी समितीवरील आपला दावा मागे घेतलेला नसला, तरी संख्याबळ पाहता ही दोन्ही महत्त्वाची पदे भाजपकडेच जाणार हे स्पष्ट आहे. शिंदे सेना महापौरपदाची मागणी करत असून, त्याबदल्यात स्थायी समिती भाजपला देण्यास तयार असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपकडून ही मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. स्थायी समितीव्यतिरिक्त सुधारणा, शिक्षण, आरोग्य आणि बेस्ट या महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदांचाही वाटा महायुतीत ठरवावा लागणार आहे.

महिला महापौराची शक्यता

आरक्षण सोडतीनुसार मुंबई महापौरपद हे सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि विद्यमान उपमहापौर अलका केरकर तसेच मुंबई भाजपचे सरचिटणीस असलेल्या राजश्री शिरवडकर यांची नावे महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापौर निवडणूक

सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर महापौर निवडणुकीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. नोंदणीनंतर किमान एका आठवड्यात महापौर निवडणूक घेण्यात येणार असून, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईला नवा महापौर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे (ठाकरे गट) जाण्याची शक्यता असून, पक्षाने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड केली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतरच विरोधी पक्षनेत्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

निकालांचा थोडक्यात आढावा

१६ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या २२७ जागांच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षाने ८९ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना (शिंदे) गटाला २९ जागा, शिवसेनेला (ठाकरे गट) ६५ जागा, मनसेला ६ जागा मिळाल्या. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून २४ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला ३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला १, एआयएमआयएमला ८ आणि समाजवादी पक्षाला २ जागा मिळाल्या आहेत.

Pune Porsche Case : रक्तनमुने बदलल्याच्या कटातील तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; ICC ने घेतली गंभीर दखल, पाक सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत PCB ला दिली वॉर्निंग

Kalyan : बिर्ला कॉलेज रोडवर धावत्या कारने घेतला पेट; प्रसंगावधानामुळे चालक बचावला, टळली मोठी दुर्घटना

Union Budget 2026 : आर्थिक अस्थिरतेचे प्रतिबिंब; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सावध अर्थसंकल्प

अजितदादांनी 'ती' गोष्ट मला सांगितली नसती का? 'राष्ट्रवादी'च्या विलीनीकरणाच्या मुद्द्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचा सवाल