मुंबई : मुंबई मनपा ही आशियातील सर्वात श्रीमंत आहे. या पालिकेचा कारभारही अवाढव्य आहेे. मुंबई महापालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष, पालिका आयुक्त यांसह इतर खाते प्रमुखांच्या दिमतीला ५० ‘फेलो’ असणार आहेत.
मुंबई महापालिकेत होणारी कामे, धोरण, प्रकल्पांचे नियोजनाचा अनुभव फेलोंना मिळेल आणि मुंबई महापालिकेच्या कारभारात हातभार लागेल, या उद्देशाने ‘फेलो’ उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करण्याची संधी आता ‘फेलो’ म्हणून उपलब्ध होणार आहे. वर्षभरासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून महिना सुमारे ५० हजार रुपये मानधन, प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने स्थायी समिती अध्यक्ष आयुक्त यांसह विविध खातेप्रमुखांच्या कार्यालयांसाठी एकूण ५० फेलो उमेदवारांची एक वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे महापालिकेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही संधी मानली जात आहे. २६ वय असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. आयुक्तांच्या मंजुरीनंतर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच अन्य महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये कामकाजासाठी या फेलोंची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
असे असणार ‘फेलो’चे काम !
‘फेलो’ म्हणजे महापालिकेच्या नियमित सेवेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती नव्हे. विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या विभागाच्या कामकाजात सहभागी होऊन प्रशासन, धोरणांची अंमलबजावणी, प्रकल्पांचे नियोजन, माहितीचे विश्लेषण, अहवाल तयार करणे आणि संबंधित विभागाच्या कामात सहाय्य करणे, अशा स्वरूपाची जबाबदारी फेलोकडे असणार आहे.
३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी !
महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे पदाचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता, मानधन, निवड प्रक्रिया आणि इतर अटी जाणून घेऊनच इच्छुकांनी अर्ज करणे आवश्यक आहे.