मुंबई : फटाक्यांमुळे मुंबईत आगीच्या अनेक दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सोमवारी रॉकेटसह आकाशात उडणारे फटाके फोडण्यास २५ नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी निवासी इमारती, इमारतींची गच्ची, गॅलरी, झोपडपट्ट्यांसह सार्वजनिक आणि खासगी ठिकाणीही लागू असेल.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रभारी अध्यक्ष आणि अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी हा आदेश जारी केला. हा आदेश तत्काळ लागू झाला आहे. तो २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहील. आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी परिमंडळीय पोलीस उपायुक्त, महापालिकेचे विभागीय सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन दलावर सोपविली आहे.
अग्निशमन दलाला आलेल्या १४२ कॉलपैकी आगीच्या १३७ दुर्घटना फटाक्यांमुळे घडल्याचे स्पष्ट झाले. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. मात्र, एकाच दिवसात आलेल्या कॉलच्या प्रचंड संख्येमुळे अग्निशमन दलाच्या यंत्रणेवर मोठा ताण आला.
अग्निशमनची दमछाक; दिवसभरात १४२ कॉल
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबई अग्निशमन दलाची अक्षरशः दमछाक केली. रविवार ८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात आगीच्या तब्बल १४२ घटनांचे कॉल अग्निशमन दलाला आले. मुख्य अग्निशमन दलाने या एका दिवसाचे वर्णन एक्स्ट्रीम डे आणि ब्लॅक डे असे केले आहे.
फटाक्यांचे जळत्या अवशेषांमुळे धोका
आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचे जळते अवशेष इमारतींच्या छतांवर, गॅलरीत, खिडक्यांमध्ये किंवा ज्वलनशील वस्तूंवर पडल्यास आग लागण्याचा धोका असतो. मुंबईतील दाट लोकवस्ती, उंच इमारती, अरुंद रस्ते आणि एकमेकांना लागून असलेल्या निवासी व व्यावसायिक इमारती लक्षात घेता अशा घटनांमुळे जीवितहानी आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार
फटाकेबंदीची व्याप्ती केवळ सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित नाही तर ती खासगी जागांनाही लागू आहे. निवासी इमारती, इमारतींची गच्ची, गॅलरी, अंगण, वाहनतळ, झोपडपट्ट्या तसेच महापालिका हद्दीतील सर्व प्रकारच्या परिसरात रॉकेट आणि आकाशात उडणारे फटाके फोडण्यास मनाई असेल. या बंदीसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ४१ (ए), २६(२), ३० आणि ३४ (एम) यांचा आधार घेण्यात आला आहे.
सर्व फटाक्यांवर बंदी नाही!
केवळ रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या तत्सम फटाक्यांवर बंदी आहे. इतर फटाक्यांवर बंदी नसून याबाबत यापूर्वीचे कायदे, सक्षम प्राधिकरणांचे आदेश आणि न्यायालयाचे निर्देश लागू राहतील, असे महापालिकेच्या पत्रकात म्हटले आहे.
महापौरांचे मुंबईकरांना आवाहन
दिवाळीत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या सणाचा आनंद दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनू नये यासाठी सुरक्षेला प्राधान्य द्या, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांना केले आहे.
आग लागल्यास येथे कॉल करा
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर तसेच ९०७६३३३१०१, ९०७६३३३१०२, ९०७६३३३१०३, ९०७६३३३१०४ आणि ९०७६३३३१०५ वर अग्निशमन दलाशी संपर्क साधावा किंवा महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
फटाक्यांमुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत
दिवाळीच्या फटाक्यांमुळे नालासोपारा आणि विरार दरम्यान सिग्नल केबल जळाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात लोकल गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांच्या सुमारास रेल्वे रुळाशेजारील सुकलेल्या गवताला फटाक्यांमुळे आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत आग विझवली, परंतु तोपर्यंत सिग्नलिंग केबल्स जळाल्यामुळे ट्रॅक सर्किट निकामी झाले होते. त्यामुळे प्रशासनाला निर्बंधांचे पालन करून गाड्या चालवाव्या लागल्या.
सोमवारच्या सकाळच्या गर्दीच्यावेळी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अप लोकल गाड्या 'ए-मार्कर' सिग्नल पाहत अतिरिक्त काळजी घेत प्रतिबंधित वेगाने चालवाव्या लागल्या. ज्यामुळे गाड्यांचा वेग मंदावला आणि विरार -चर्चगेट कॉरिडोअरवर गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी फलाटांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
विशेषतः जलद मार्गावरील सेवांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. रेल्वे तांत्रिक पथकांनी तातडीने बिघाड सुधारण्याचे काम सुरू केले. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवरील कांजूरमार्गच्या घटनेनंतर घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.