Mumbai : अग्निशमनमधून वीजनिर्मिती; ११ ठिकाणच्या प्रकल्पातून ८०० किलोवाॅट क्षमता  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : अग्निशमनमधून वीजनिर्मिती; ११ ठिकाणच्या प्रकल्पातून ८०० किलोवाॅट क्षमता

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेली अग्निशमन केंद्रे आता स्वतःच वीज निर्मिती करणार आहेत. मुंबई महापालिकेने शहरातील १० प्रमुख अग्निशमन केंद्रांसह भायखळा येथील मुख्यालयाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेली अग्निशमन केंद्रे आता स्वतःच वीज निर्मिती करणार आहेत. मुंबई महापालिकेने शहरातील १० प्रमुख अग्निशमन केंद्रांसह भायखळा येथील मुख्यालयाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ठिकाणी एकूण ८०० किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिका ४ कोटी २६ लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबईच्या वाढत्या वीज खर्चाला आळा घालण्याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन आणि २०५० पर्यंत मुंबईला नेट झिरो करण्याच्या उद्दिष्टाचाही हा भाग आहे.

मुंबई महापालिकेने सौरऊर्जा निर्मितीसाठी निवडलेल्या ठिकाणांमध्ये कुलाबा अग्निशमन केंद्रात ५५ किलोवॉट, दादरमध्ये ६०, नरिमन पॉइंटमध्ये ५०, वांद्रे येथे ६५, बोरिवली येथे ७५, बीकेसी येथे ३५, गोरेगाव येथे ३०, दहिसर येथे ३५, मुलुंड येथे ६५ आणि मानखुर्द येथे ६० किलोवॉट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तर भायखळा येथील महापालिका मुद्रणालयात १७० किलोवॉट क्षमतेचे दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. यात १०० किलोवॉटचा बॅटरीविरहित आणि ७० किलोवॉटचा बॅटरीयुक्त प्रकल्प असेल. मुद्रणालयात दिवसरात्र छपाईचे काम सुरू असल्याने तेथील मोठ्या वीज वापराचा विचार करून या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. यामुळे वीज निर्मितीला मोठा फायदा होणार आहे.

पाच वर्षे देखभालीची जबाबदारी

निविदेतील अटींनुसार पावसाळ्याचा कालावधी वगळता सहा महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीकडे पुढील पाच वर्षे देखभाल, स्वच्छता आणि कार्यक्षमतेची जबाबदारीही सोपविण्यात येणार आहे.

वर्षाला १० लाख युनिट विजेची निर्मिती

प्रकल्पातून वर्षाला सुमारे १० लाख युनिट हरित ऊर्जेची निर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज खर्चात मोठी बचत होण्यासोबतच सुमारे ८०० टन कार्बन उत्सर्जन कमी होण्याचा अंदाज आहे. अग्निशमन केंद्रे ही आपत्कालीन सेवा असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यासही अत्यावश्यक यंत्रणा सुरू ठेवण्याच्या दृष्टीने सौरऊर्जेचा उपयोग होणार आहे. विशेषतः भायखळा मुद्रणालयातील बॅटरीयुक्त प्रकल्पामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही कामकाज सुरू ठेवण्यास मदत होईल.

३६ अग्निशमन केंद्रांवर सौरऊर्जेचे नियोजन

मुंबई महापालिकेच्या इमारतींवर यापूर्वीच दोन मेगावॅट अधिक क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. आता ७०० किलोवॅट क्षमतेचा हा प्रकल्प त्याच उपक्रमाचा पुढील टप्पा आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईतील सर्व ३६ अग्निशमन केंद्रे आणि २४ विभाग कार्यालयांवरही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज निर्मितीची प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात हवामान बदलणार; दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा कडाका; IMD चा मोठा अंदाज

'पॅन' अन् 'मतदार कार्ड' नागरिकत्वाचा पुरावा नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळला दावा

देवेंद्र फडणवीस-तटकरे भेट; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात

मुंबईतील ४३ बेकऱ्यांना BMC ने टाळे ठोकले; स्वच्छ इंधनाचा वापर न केल्याने परवाने रद्द

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू