मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणार; पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांचा निर्धार 
मुंबई

मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणार; पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांचा निर्धार

मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्याचा निर्धार मुंबई मनपाच्या नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्याचा निर्धार मुंबई मनपाच्या नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी व्यक्त केला. महापालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी मंगळवारी मुंबई महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली.

मुंबई महापालिका निवडणुकानंतर आता लोकप्रतिनिधींचे राज्य सुरू झाले आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या नव्या व्यवस्थेत महापालिका अधिक सक्षमपणे काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. कोविड काळात शहरात काम करण्याची संधी मिळाली याचाही त्यांनी उल्लेख केला व सर्व आव्हानांना सामोरे जाऊन आपण शहरासाठी विकासासाठी काम करू असे त्या म्हणाल्या.

महिला प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यावर आपण भर देऊ असे नमूद करून भिडे म्हणाल्या की मुंबईतील वाहतूक व्यवस्था ही महिलांसाठी उपयुक्त ठरली आहे. मुंबईकर व महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

मुंबई महापालिकेला १५० वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा लाभला आहे याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, मुंबईत आपल्याला प्रशासनात विविध स्तरावर कामाचा अनुभव आहे व तो या नव्या जबाबदारीत उपयोगी पडेल.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे वेगाने पूर्ण होतील याच्याकडे आपण जातीने लक्ष पुरवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सेवानिवृत्त आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून बरेच काही शिकले. गगराणी हे कोल्हापूरचे तर मी सांगलीची. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करणार आहे, असे भिडे यांनी सांगितले.

गेली दोन वर्षे मुंबईची सेवा करण्याचे भाग्य लाभले सगळ्यांचे सहकार्य लाभले, असे सांगत सेवानिवृत्त आयुक्त भूषण गगराणी यांनी सगळ्यांचे आभार मानले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

अनुभव ठरला निर्णायक

अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश मंगळवारी दुपारी जारी केला. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बऱ्याच चर्चा झडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यावेळी संजय मुखर्जी आणि असीम गुप्ता यांच्या नावांवरही चर्चा झाली. मात्र अनुभव आणि प्रशासकीय शैलीमुळे अखेर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मेट्रो रेल्वेचे एमडीपदही भिडेंकडेच

भिडे या मुख्यमंत्री सचिवालयात अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता. एमएमआरसीएल व्यवस्थापकीय संचालकपदाचा हा अतिरिक्त कार्यभार त्या पुढेही सांभाळणार आहेत.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी