मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे मध्यान्ह भोजन देण्यात येते, असा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नगरसेवक अंकित सायली सुनील प्रभू यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) तातडीने कारवाई करावी, असे पत्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना लिहिल्याचे अंकित प्रभू यांनी सांगितले.
पालिका शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीचा असून, शिजवताना आणि पुरवताना स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून प्राप्त झाल्या आहेत.
पुरवठादारांकडून उडवाउडवीची उत्तरे
या गंभीर समस्येबाबत संबंधित पुरवठादार संस्थांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ‘केंद्र शासनाकडून मिळणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे.’ असे सांगून प्रशासन आणि पुरवठादार आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अंकित प्रभु यांनी केला आहे.
लक्षात घेता तत्काळ चौकशीची विनंती
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विषयात लक्ष घालावे. लहान मुलांचे आरोग्य आणि भविष्य लक्षात घेता, या पत्राची दखल घेऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी विनंती प्रभु यांनी केली आहे.