मुंबई : मुंबई महापालिकेत २५ वर्षांनंतर सत्तांतर झाल्यानंतर महिलांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी प्रथमच ‘मेट्रो वूमन’ अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे, तर महापौर रितू तावडे, बेस्ट समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्षपदी महिलांची निवड झाल्याने मुंबई महानगरपालिकेत खऱ्या अर्थाने महिलाराज आले आहे.
मुंबईतील २२७ प्रभागासाठी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल १३५ महिला विजयी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत महिलांचा बोलबाला आहे. त्यातच महापौर महिला, विविध समित्यांवर महिलांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मुंबई महापालिकेत प्रथमच महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महापालिकेत आयुक्तपदी महिलेची वर्णी लागली असून बहुतांश समिती अध्यक्ष पदी महिलांची वर्णी लागली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत महिला राज आले आहे.
सभागृहात आवाज महिलांचाच
मुंबई महापालिकेत २२७ पैकी १३५ सर्वपक्षीय महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. मुंबई महापालिकेची महत्त्वाची स्थायी समिती असो वा अन्य समिती त्याठिकाणी अध्यक्ष सदस्य महिला आहेत. मुंबई महापालिकेच्या सभागृहात महिलांची संख्या अधिक असल्याने सभागृहात महिलांचा बोलबाला आहे.
मुंबई महापालिकेत महिलाराज
महापौर - रितू तावडे
मुंबई महापालिका आयुक्त - अश्विनी भिडे
अतिरिक्त आयुक्त - अश्विनी जोशी
बेस्ट समिती अध्यक्ष - तृष्णा विश्वासराव
शिक्षण समिती अध्यक्ष - राजेश्री शिरवडकर
सुधार समिती अध्यक्ष - संध्या दोशी
महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष - मीनल तुडे
महिला व बालकल्याण समिती उपाध्यक्ष - रिटा मकवाना
विधी समिती अध्यक्ष - दीक्षा कारकर
बाजार व उद्यान समिती अध्यक्ष - हेतल गाला
स्थापत्य समिती शहर सभापती - यामिनी जाधव
स्थापत्य समिती उपनगर सभापती - संगीता शर्मा
एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष - आशा मराठे
एन प्रभाग समिती अध्यक्ष - अश्विनी मते
एस टी प्रभाग समिती अध्यक्ष - साक्षी दळवी
एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्ष - खैरनुसा अकबर हुसेन
विरोधी पक्षनेत्या - किशोरी पेडणेकर
महापालिका सचिव - मंजिरी देशपांडे
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख - रश्मी लोखंडे
अश्विनी भिडे यांचा कार्यकाळ
अश्विनी भिडे या १९९५च्या महाराष्ट्र कॅडरच्या सनदी अधिकारी आहेत. मूळच्या सांगली असलेल्या अश्विनी भिडे यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला कोल्हापूरपासून सुरुवात झाली. १९९७ ते ९९ या काळात त्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. त्यानंतर नागपूरमध्येही त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून काम केले. नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना त्यांनी ३१० गावांमध्ये ४३४ धरणे बांधून ७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता.
२००८ मध्ये अश्विनी भिडे या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली सध्याचा पूर्वमुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्रीवे आणि सहार एलिव्हेटेड ॲक्सेसोड तसेच मिठी नदीची स्वच्छता अशा अनेक प्रकल्पांना दिशा देऊन ती कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
राज्यात २०१४ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाखाली, देवेंद्र यांनी आपले मेट्रो रेल्वेचे स्वप्न साकारण्यासाठी २०१५ मध्ये अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली. अश्विनी भिडे यांनी हा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांच्या अथक प्रयत्नानंतर मुंबईकरांना मेट्रोचा सुखकर प्रवास करणे शक्य झाले आहे. म्हणूनच ‘मेट्रो वुमन’ म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कोस्टल रोडचे काम पूर्णत्वास नेले. मुख्यमंत्री कार्यालयात त्यांनी अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. अश्विनी भिडे यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने मुंबई महापालिकेच्या कामकाजाला आणखी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ९ मे २०२० ते १९ मार्च २०२४ या कालावधीत अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर कार्य केले आहे. कोविडसारख्या परिस्थितीत काम करण्याची संधी मिळाली. विविध ठिकाणी विविध पदांवर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यांबद्दल त्यांना विविध संस्था-संघटनांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही अश्विनी भिडे सांभाळत आहेत.
मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त होण्याचा मान अश्विनी भिडे यांना मिळाला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पायाभूत प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय कामगिरी भिडे यांनी केली आहे.
मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या सचिव, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
अत्यंत कार्यक्षम अधिकारी असा अश्विनी भिडे यांचा लौकिक आहे.
मुंबई शहरातील पायाभूत सुविधा व प्रशासनातील महत्त्वाचे प्रकल्प हाताळण्याची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्यावर असणार आहे.
अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबईतील प्रशासन आणि पायाभूत विकासासाठी महत्त्वाची मानली जात आहे.