मुंबई : स्तनपान करणाऱ्या मातांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यानात स्तनपान करणाऱ्या मातांसाठी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यासाठीचा आराखडा पालिका प्रशासनाने तयार केल्याचे मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. दरम्यान, उद्यानात कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत याचा समावेश करावा लागणार आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
स्तनपान करणाऱ्या मातांसाठी
एसटी डेपो, रेल्वे स्थानक, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी स्तनपान कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. स्तनपान करणाऱ्या माता प्रवास करत असताना तान्ह्या बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांतही अशा प्रकारचे हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र, त्याचा वापर होतोच असे नाही. अनेक कक्ष हे बंदच असतात.
काही उद्यानांत कक्ष उभारणार मुंबई महापालिकेच्या सर्व वॉर्डच्या कार्यालतही स्तनपान करणाऱ्या मातांसाठी कक्ष उभारले आहेत. आता हीच संकल्पना महापालिकेच्या उद्यानात राबवण्यात येणार आहे. मुंबईत एकूण ३२५ उद्याने, ३६९ खेळाची मैदाने आणि ४८० मनोरंजन मैदाने आहेत. त्यापैकी ३२५ उद्यानांपैकी काही उद्यानात प्रायोगिक तत्त्वावर मातांसाठी स्तनपान कक्ष स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उद्यानात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई
नियमानुसार कोणत्याही उद्यानात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. उद्यानात स्तनपान कक्ष स्थापन करण्यासाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मध्ये (डीसीपीआर) समावेश करण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अश्विनी भिडे यांनी महापालिका सभागृहात अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या निवेदनातून दिली.