मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या राज्यातील कामाला वेग आला आहे. भुयारीकरणाच्या कामासाठी दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनचे (टीबीएम) 'कटरहेड' घणसोली येथील सावली शाफ्टमध्ये यशस्वीरीत्या उतरविण्यात आले आहे. हे टीबीएम सावली येथून विक्रोळीच्या दिशेने भुयारीकरणाचे उत्खनन करणार आहे.
गेल्या आठवड्यात पहिल्या टीबीएमचे 'कटरहेड' विक्रोळी येथे उतरविण्यात आले होते. दोन्ही टीबीएमची अंतिम असेंब्ली आणि कमिशनिंग चाचण्या सध्या सुरू आहेत. जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात भुयारीकरणाच्या प्रारंभिक चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे.
सुमारे १३.६ मीटर व्यास आणि सुमारे ३५० टन वजन असलेले हे कटरहेड टीबीएमच्या मुख्य शिल्ड जोडणीतील महत्त्वाचा घटक आहे. १३.६ मीटर व्यासाचे हे कटरहेड एकाच मोठ्या बोगद्यातून हाय-स्पीड रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाचे उत्खनन करण्यासाठी विशेष संरचित केले आहे. या कटरहेडमध्ये ८४ कटर डिस्क, १२४ स्क्रॅपर आणि १६ बकेट लिप्स बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून खडक कापणे आणि मलबा हटविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. मुंबईतील बुलेट ट्रेनच्या भुयारीकरणासाठी २ टीबीएम आले आहेत. टीबीएम १ चे वजन ३०८० टन तर टीबीएम २ चे वजन ३१८४ टन आहे.
प्रत्येक टीबीएमची एकूण लांबी ९५.३२ मीटर असून, त्यामध्ये कटर व्हील, मेन बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन शिल्ड, टेल शिल्ड आणि टनेलिंगसाठी सहाय्यक चार विशेष गॅन्ट्री यांसारखे महत्त्वाचे घटक समाविष्ट आहेत. ही अत्याधुनिक यंत्रणा कमाल ४ आरपीएम कटरहेड गती आणि ४९ मि.मी. प्रति मिनिट उत्खनन क्षमतेसह कार्य करू शकते.
महाराष्ट्रात ४ स्थानके
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू आहे. बुलेट ट्रेनची गुजरातमध्ये ८ आणि महाराष्ट्रात ४ अशी एकूण १२ स्थानके असणार आहेत. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती ही स्थानके असून प्रत्येक स्थानकाचे काम विविध टप्यात सुरू आहे.