अभिषेक पाठक/मुंबई:
पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकाचा मोठा पुनर्विकास प्रस्ताव तयार केला आहे. या स्थानकाची ऐतिहासिक वास्तू जपत आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करून मुंबई सेंट्रलचे एका आधुनिक ‘मल्टीमोडल ट्रान्सिट हब’मध्ये रुपांतर करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेत स्थानकाच्या ९६ वर्षे जुन्या वारसा इमारतीचा काही भाग एका ‘बजेट हॉटेल’मध्ये बदलला जाईल, तसेच स्थानकाबाहेरील सुमारे १,५०० चौरस मीटर मोकळ्या जागेवर प्रवाशांसाठी व्यावसायिक ‘पॅसेंजर प्लाझा’ उभारला जाईल. प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासोबतच रेल्वेसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे या उद्देशाने हा प्रकल्प उभारला जात आहे.
मुंबई सेंट्रल हे आता पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि मेट्रो लाइन ३ यांना जोडणारे एक महत्त्वाचे ‘इंटरचेंज पॉइंट’ बनले आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, मेट्रो लाइन-३ मुळे आता प्रवाशांना मुंबई सेंट्रल ते सीएसएमटी दरम्यान अवघ्या १५ ते २० मिनिटांत प्रवास करता येईल, ज्यामुळे हे स्थानक शहराचे एक प्रमुख वाहतूक केंद्र बनले आहे.
हेरिटेज स्टेशन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ‘रिटायरिंग रूम्स’ ३१ जुलैपासून बंद केल्या जातील, तर १ ऑगस्टपासून प्राथमिक दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू होणार आहे. या सुविधेत २ डॉर्मिटरीसह ११ खोल्यांचा समावेश आहे. सध्या केवळ तीन ते चार खोल्याच वापरात असून तिथे खूप कमी प्रवासी उतरतात, तर उर्वरित खोल्या गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेचे नूतनीकरण, देखभाल आणि संचालन करण्यासाठी एका खाजगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतनीकरण केलेली ही जागा पुढील तीन ते चार महिन्यांत रेल्वे प्रवाशांसाठी वातानुकूलित आणि बिगर-वातानुकूलित खोल्या असलेले एक बजेट हॉटेल म्हणून पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘वापरात नसलेल्या हेरिटेज जागांचे पुनरुज्जीवन करून त्या प्रवाशांसाठी उपयुक्त बनवणे हा आमचा उद्देश आहे. ही इमारत एक ऐतिहासिक वास्तू असल्याने, कोणत्याही संरचनेत बदल न करता या खोल्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज केल्या जातील.’
पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेरील दीर्घकाळापासून असलेले अतिक्रमण हटवून जवळपास १,५०० चौरस मीटर जागा मोकळी केली आहे. उपस्टेशन अधीक्षक (वाणिज्य) हरमीत सिंग यांच्या मते, या जागेवर हमाल गट आणि बेकायदेशीर पार्किंग चालकांचा ताबा होता, तसेच तेथे अनेक बेकायदेशीर हालचाली होत असल्याच्या तक्रारी होत्या. अनेक आव्हाने असूनही अतिक्रमण हटवून संपूर्ण १,५०० चौरस मीटर परिसर मोकळा करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. ही जागा आता प्रवाशांच्या सोयीसाठी विकसित करण्यासाठी उपलब्ध केली आहे.
प. रेल्वेला ५० लाख उत्पन्न मिळणार
प्रत्येक खोलीचे क्षेत्रफळ सुमारे २०० चौरस फूट असून त्याला संलग्न शौचालय आहे. या खोल्यांमध्ये सुमारे ५ ते ७ दशके जुनी सागवानी लाकडाची कपाटे आहेत, जी नूतनीकरणादरम्यान जशीच्या तशी ठेवली जाण्याची शक्यता आहे. खासगी कंत्राटदारासोबतच्या या परवाना करारातून पश्चिम रेल्वेला पाच वर्षांत सुमारे ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.