Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक 
मुंबई

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

मंगळवारी आशीषने विष्णुमायाला एका मित्रासोबत पाहिले होते. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

Mayuri Gawade

मुंबईतील चेंबूर परिसरात मंगळवारी (दि.३०) चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला विषारी पदार्थ मिसळलेले कोल्ड ड्रिंक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पेय प्यायल्यानंतर विष्णुमाया या तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासात तिच्या प्रियकरावर संशय बळावल्यानंतर आरसीएफ पोलिसांनी प्रियकर आशीष मगर याला अटक केली आहे. वृत्तांनुसार, विष्णुमाया सुमारे दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती होती.

चारित्र्यावर संशय घेत दोघांमध्ये जोरदार वाद

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आशीषने विष्णुमायाला एका मित्रासोबत पाहिले होते. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत दोघांमध्ये जोरदार वाद झाला. काही वेळाने वाद शांत झाल्यानंतर आशीषने तिला कोल्ड ड्रिंक दिल्याचा आरोप आहे. या पेयामध्ये विषारी पदार्थ मिसळण्यात आला होता, असा पोलिसांचा संशय आहे.

कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर विष्णुमायाला उलट्या सुरू झाल्या आणि तिची प्रकृती झपाट्याने बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवालातून मिळाला महत्त्वाचा धागा

सुरुवातीला या मृत्यूमागे संशयास्पद बाब स्पष्ट झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर तपासाला वेगळे वळण मिळाले.

बेशुद्ध होण्यापूर्वी विष्णुमायाने आशीषने दिलेले कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतरच त्रास सुरू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले होते, अशी माहिती तपासात समोर आली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

प्रियकराला अटक

आरसीएफ पोलिसांनी संबंधित व्यक्तींची चौकशी करत परिस्थितीजन्य पुरावे तपासले. चौकशीदरम्यान आशीषने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने आशीषला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार, कोल्ड ड्रिंकमध्ये डांबराच्या गोळ्या मिसळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन; शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क; सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

भारताला तेल दिलासा; प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

Thane : पुलाचा लोखंडी सांगाडा कारवर कोसळला; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड