मुंबई : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागविण्यासाठी सप्टेंबर महिन्यात सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. १९ ऑगस्ट रोजी सातही धरणात १३ लाख ६२ हजार ६२४ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
मात्र एल निनोमुळे पावसाने पाठ फिरवली तर पाणीसाठा कमी होऊ शकतो. त्यामुळे सातही धरणात सप्टेंबरअखेरीस किती पाणीसाठा उपलब्ध आहे, त्याचा आढावा घेत १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते.
सध्या सातही धरणात १९ ऑगस्ट रोजी १३ लाख ६२ हजार ६२४ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र एल निनोचा प्रभाव असल्याने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस धरणातील पाणीसाठ्याच्या आधारे १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही बांगर म्हणाले.
धरणक्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)
अप्पर वैतरणा - ३९.०० मिमी
मोडक सागर - ४.०० मिमी
तानसा - ४.०० मिमी
मध्य वैतरणा - ५.०० मिमी
भातसा - ६.०० मिमी
विहार - १०.०० मिमी
तुळशी - ८.०० मिमी
१९ ऑगस्ट रोजी पाणीसाठा (द. लि.)
अप्पर वैतरणा - १, ९६,८४०
मोडक सागर - १, २८,९२५
तानसा - १,४३,७१०
मध्य वैतरणा - १,८३, ४४२
भातसा - ६,७३,९६३
विहार - २७,६९८
तुळशी - ८,०४६