मुंबई : मुंबईतील पायाभूत सुविधा, विकासकामे मार्गी लावण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्षातील खासदार-आमदारांना भरभरून निधी दिल्याचे समोर आले आहे. २००२३-२४, २०२४ -२५ व २०२५-२६ या तीन वर्षांत तब्बल १ हजार ६०० कोटी रुपये सत्ताधारी पक्षातील खासदार व आमदारांना वाटप केल्याची धक्कादायक तपशील माहिती अधिकारातून समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी माहिती अधिकारात मुंबई महापालिकेकडे माहिती मागितली होती.
७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ८ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आली. नगरसेवक नसल्याने मुंबईतील पायाभूत सुविधा विकासकामे मार्गी लावण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून खासदार व आमदारांना निधी उपलब्ध करून देण्यात आला. विशेष म्हणजे पायाभूत सुविधा विकासकामे यासाठी पालिका प्रशासनाकडून देण्यात येणारा निधी केवळ सत्ताधारी पक्षातील खासदार-आमदारांना देण्यात आल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. विरोधी पक्षाचे आमदार आणि खासदार यांना गेल्या ३ आर्थिक वर्षात निधीच देण्यात आलेला नाही. विरोधी पक्षाचे आमदार-खासदार यांना निधी न देणे म्हणजे निधी वाटपातील हे राजकारण असून त्या त्या मतदारसंघातील नागरिकांवर अन्याय आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी केली आहे.
असे झाले निधीवाटप
२०२३-२४ मध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या एकूण तीन खासदारांना आणि २१ आमदारांना एकूण ७३६ कोटी ८५ लाख रुपये निधी महापालिकेने वितरित केला आहे. तर २०२४-२५ मध्ये एकूण २६ पैकी एका भाजपच्या आणि एका शिवसेनेच्या खासदाराला निधी वितरित करताना ऊर्वरित आमदारांना निधी देण्यात आला आहे. हा एकूण निधी ३७८ कोटी ३२ लाख रुपये आहे. याशिवाय २०२५-२६ मध्ये तीन खासदार आणि २७ आमदारांना एकूण ४८७ कोटी ८१ लाख रुपये निधीचे वाटप केले आहे.
गेल्या ३ वर्षांत सत्ताधाऱ्यांना निधी वाटप
२०२३-२४ : ७३६ कोटी
२०२४-२५ : ३७८ कोटी
२०२४-२५ : ४८७ कोटी